अधिकार्‍यांसह ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा

पालघर कोर्टाचा आदेश

Mumbai

सरकारी निधीची अपहार केल्याप्रकरणी पालघर नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी, शाखा अभियंता, ठेकेदार, लिपीक, तत्कालीन लेखापाल यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालघर कनिष्ठ न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

2013 – 14 मध्ये पालघर नगरपरिषदेच्या वॉर्ड क्रमांक 25 मध्ये सार्वजनिक बोरिंगपासून ते प्रल्हाद मुकटे यांच्या घरापर्यंतचा रस्ता, तसेच शिंदे यांच्या घरापासून ते शंकर डोंगरकर यांच्या घरापर्यंतचा रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाची निविदा काढण्यात आली होती. ही निविदा काढल्यानंतर ही दोन्ही कामे ए. बी. व्हीं.गोविंदू या ठेकेदाराला देण्यात आली होती. या दोन्ही कामापोटी ठेकेदाराला 4 लाख 64 हजार 499 रूपये अदा करण्यात आले होते.

धक्कादायक बाब म्हणजे झालेल्या कामाचे बिल अदा केल्यानंतर पुन्हा ठेकेदाराला तेच काम दाखवून तेवढीच रक्कम पुन्हा अदा करण्यात आली होती. ही बाब नगरसेवक कैलास म्हात्रे यांना समजताच याप्रकरणी त्यांनी 2017 मध्ये मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्याकडे तक्रार केली होती. नगरपरिषदेच्या निधीचा अपहार झाल्याने मुख्याधिकार्‍यांसह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी म्हात्रे यांनी नगरविकास खात्याकडे केली होती. त्यानंतरही याप्रकरणावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे लक्षात येताच कैलास म्हात्रे यांनी पालघर दुय्यम स्तर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायालयात सुमारे दीड वर्ष ही याचिका सुुरु होऊन सुनावण्या आणि तारखांवर तारखा पडत होत्या. त्यामुळे म्हात्रे यांनी 2018 ला याप्रकरणी जनहित याचिका दाखल केली होती. न्या. धर्माधिकारी व न्या. सारंग कोतवाल या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने संबंधित प्रकरणातील पाचही आरोपींवर तरतूद केलेल्या नियमानुसार 156 (3) प्रमाणे आठ आठवड्यात कारवाई करावी, असे आदेश दिवाणी न्यायालयाने द्यावे असे म्हटले होते. त्यानंतर या अर्जावर लोकसेवक म्हणून शासनाने 90 दिवसात यावर निर्णय न घेतल्याने न्यायालयाने संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत.

शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी वैभव आवारे,तत्कालीन शाखा अभियंता प्रेमचंद मिश्रा, लिपिक संतोष जोशी,ठेकेदार मे. ए.बी.व्ही. गोविदु व निवृत्त लेखापाल बाळकृष्ण जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कनिष्ठ न्यायालयाने पालघर पोलिसांना दिलेले आहेत.

शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी विविध ठिकाणी तक्रारी केल्यानंतर न्यायालयाने खर्‍या अर्थाने याप्रकरणाला न्याय दिला. आता पालघर पोलीस काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.
– कैलास म्हात्रे , नगरसेवक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here