घरमुंबईसुंदर होण्यासाठी जे.जे.मध्ये रांग; आठवड्याला २० ते २५ रुग्ण

सुंदर होण्यासाठी जे.जे.मध्ये रांग; आठवड्याला २० ते २५ रुग्ण

Subscribe

ओठ मादक बनवणे, चेहर्‍यावरील व्रण घालवणे, तीळ काढणे, स्तन व हनुवटीचा आकार बदलणे यासारख्या शस्त्रक्रियांसाठी जे.जे. हॉस्पिटलमध्ये जुलैमध्ये कॉस्मेटिक सर्जरी विभाग सुरू करण्यात आला.

ओठ मादक बनवणे, चेहर्‍यावरील व्रण घालवणे, तीळ काढणे, स्तन व हनुवटीचा आकार बदलणे यासारख्या शस्त्रक्रियांसाठी जे.जे. हॉस्पिटलमध्ये जुलैमध्ये कॉस्मेटिक सर्जरी विभाग सुरू करण्यात आला. प्लास्टिक सर्जरी विभागाच्या अंतर्गत हा विभाग सुरू करण्यात आला आहे. विभाग सुरू झाल्यापासून सुंदर होण्यासाठी तिथे तरुण-तरुणींच्या रांगा लागत आहेत. आठवड्यातून दोनवेळा असणार्‍या बाह्यरुग्ण विभागात 20 ते 25 जण हजेरी लावतात. मुंबईबाहेरूनही मोठ्या संख्येने लोक येतात.

चित्रपटसृष्टीतील अभिनेते व अभिनेत्री यांच्याप्रमाणे आपणही सुंदर दिसावे, अशी अनेक तरुण-तरुणींची इच्छा असते. कार्पोरेट क्षेत्रामध्ये गलेलठ्ठ पगार घेणारी तरुणाई सुंदर दिसण्यासाठी काहीही करायला तयार असते. तोच काहीसा प्रकार जे.जे.त पाहायला मिळतो आहे.चरबी कमी करून लठ्ठपणा घालवून कमनीय बांधा मिळवण्यासाठी तसेच नाक, ओठ, हनुवटी, पापण्या आकर्षक बनविण्यासाठी शस्त्रक्रिया करून घेणार्‍यांची संख्या मोठी आहे. पण अशा शस्त्रक्रिया करण्यासाठी बराच खर्च येत असे. यामुळे इच्छा असूनही बर्‍याच जणांना ते शक्य होत नसे. जे.जे.त हा विभाग सुरू केल्यानंतर खर्च खूपच कमी झाला आहे. त्यामुळे तरुण-तरुणींकडून शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी रांगा लागत आहेत. जे.जे.मध्ये आठवड्यातून दोनवेळा चालणार्‍या प्लास्टिक सर्जरी विभागाच्या ओपीडीमध्ये 80 ते 90 जण उपचारासाठी येतात. त्यात कॉस्मेटिक सर्जरीच्या ओपीडीला 20 ते 25 जण असतात. यात मुंबई व उपनगरासोबत अंबरनाथ, भिवंडी, नाशिक येथून येणार्‍यांची संख्या मोठी आहे.

- Advertisement -

कॉस्मेटिक सर्जरी विभाग सुरू करण्यात आल्यानंतर जे.जे.हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या मार्गदर्शनाखाली 23 व 24 जुलैला विभागातर्फे हॉस्पिटलमध्ये पहिला ‘कॉस्मेटिक सर्जरी ऑपरेटिव्ह कॅम्प’ ठेवण्यात आला होता. यामध्ये 18 जणांनी नोंद केली होती. त्यातील 10 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये पोटाची चरबी कमी करणे, स्तन, नाक, लायपोसक्शन, तोंडावरील व्रण कमी करण्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या, अशी माहिती प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत घरवडे यांनी दिली.

कॉस्मेटिक सर्जरीबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. जे.जे. हॉस्पिटलमध्ये यावर मोफत उपचार होत असल्याचे नागरिकांना जसे समजत आहे, तशी इच्छुकांची संख्या वाढत आहे. मुंबईतील नागरिक अधिक असतील असे आम्हाला वाटत होते; पण अंबरनाथ, भिवंडी, नाशिक येथूनही येणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे.
– डॉ. चंद्रकांत घरवडे, विभागप्रमुख, प्लास्टिक सर्जरी विभाग.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -