घरमुंबईपावसाचा कहर

पावसाचा कहर

Subscribe

•ठाणे, पालघरमध्ये मोठे नुकसान
•वसईतील मेढे पूल पाण्याखालीच
•जुन्या कसारा घाटात रस्त्याला तडे
•रायते पुलाजवळील रस्ता खचला
•स्लॅब कोसळून चिमुकल्याचा मृत्यू
•भुईगाव समुद्रात दोन मृतदेह सापडले

ठाणे, पालघर, रायगड परिसरात मागील चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल झाले. कल्याण, बदलापूरमधील पूर ओसरला असला तरी नागरिकांना आता साथीच्या आजारांची भीती आहे. ठाणे तालुक्यातील वालधुनी, उल्हास अशा बहुतेक नद्यांना पूर आल्यामुळे कल्याणपासून बदलापूरपर्यंतच्या परिसराला मोठा फटका बसला आहे. येथील रहिवाशांच्या घरातील पाणी ओसरल्यानंतर घरादाराचा झालेला चिखल पाहून नागरिकांचे डोळे पाणावले. तर साथीच्या आजारांच्या शक्यतेमुळे महापालिका आणि आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलून जंतूनाशक फवारणी आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

- Advertisement -

या पुराने पुन्हा एकदा १४ वर्षापूर्वीच्या २६ जुलैच्या कटू आठवणी ताज्या केल्या. बदलापूर आणि वांगणी दरम्यान अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांची सुटका करण्यात बचाव पथकाला यश आले. रविवारी रात्री साडेआठ वाजता बदलापूरहून कर्जतपर्यंत लोकल चालवण्यात आली. रेल्वे रुळाखालची खडी काही ठिकाणी वाहून गेल्यामुळे रेल्वेमार्गाची तपासणी केल्यावर वाहतूक पूर्ववत केली जाणार आहे.

१० हजार नागरिकांचा संपर्क तुटला
वसईतील संततधार पावसामुळे मेढे पूल पाण्याखाली गेलेला असून १९ गावपाड्यातील जवळपास १० हजार नागरिकांचा संपर्क तुटला असून भातशेती वाहून गेल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर आले आहे. अंबरनाथमध्ये जीआयपी धरणाची संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्याने काकोळे गावातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. भातशेतीलाही मोठा धोका निर्माण झाला असून रेल्वेने तातडीने या भिंतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी होत आहे.

- Advertisement -

रस्त्याला तडे
मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटा पावसामुळे जवळपास ३०० मीटर भागातील रस्त्याला तडे गेले .
त्यामुळे रस्ता खचण्याच्या शक्यतेमुळे वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक अत्यंत धिम्या गतीने एकेरी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्याचे काम तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. तरीही रस्त्याला तडे गेल्याने संताप व्यक्त होत आहे.

कल्याण नगर वाहतूक बंद
मुसळधार पावसामुळे कल्याण-मुरबाड मार्गावरील रायते पुलाजवळील जोड रस्ता खचला आहे. त्यामुळे कल्याण-नगर महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पूल पूर्णतः पाण्याखाली गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. पुलाचा भलामोठा भाग पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक टिटवाळा तसेच इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. कल्याणमध्ये पुरामुळे पाणीपुरवठा बंद असल्याने शहरातील नागरिकांचे हाल झाले आहेत. मोहने आणि मोहिली या दोन्ही पंपिंग स्टेशनवर युद्धपातळीवर दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले आहे. पनवेल भागातही पावसामुळे मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले होते. कामोठे भागात पाणी तुंबले तर ठिकठिकाणी झाडे कोसळली.

पाणी झिरपून स्लॅब कोसळला
पावसाचे पाणी गच्चीत साचल्याने पाणी झिरपून स्लॅब कोसळण्याची दुर्देवी घटना उल्हासनगरात घडली आहे. या दुर्घटनेत नीरज सातपुते या चार वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यानंतर ही इमारत तातडीने रिकामी करण्यात आली असून ती सील करण्यात आली आहे.

भुईगाव समुद्रात दोन मृतदेह सापडले
२६ जुलै रोजी वसईतील भुईगाव समुद्रकिनारी फिरायला गेलेले अठरा वर्षाचे दोन तरुण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाले होते. सईम शेख आणि सोहेल खान अशी या दोघांची नावे आहेत. दोन दिवसांच्या अथक शोध मोहिमेनंतर या दोघांचे मृतदेह रविवारी दुपारी हाती लागले.

अलर्ट; पण मुंबईत पाऊस फिरकलाच नाही

2६ जुलैच्या दिवशी ठाणे, कल्याण, बदलापूरमध्ये मुसळधार बरसात करणारा पाऊस मुंबईत फिरकलाच नाही. रविवारी मुंबईत अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता होती. परंतु, तुरळक सरी कोसळत पाऊस मुंबईत केवळ डोकावून गेला. श्रावणापूर्वीचा हा शेवटचा रविवार असला तरी आषाढी एकादशीमुळे अनेकांचा गटापीचा मुहूर्त चुकला. त्यातच पावसाने ऐन सुट्टीच्या दिवशी मुंबईकरांची निराशा केली.

मुंबईत रविवारी अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. परंतु संध्याकाळपर्यंत शहरात ४.८ मि.मी आणि उपनगरात ०.५ मि.मी एवढ्याच पावसाची नोंद झाली आहे. तर पुढील २४ तासांमध्ये मुंबई शहर व उपनगरांत दिवसा अधून मधून पावसाच्या सरी व सायंकाळी व रात्री जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनी वर्तवली आहे. मुंबईत दिवसभरात ७ ठिकाणी शॉट सर्कीट तर ८ ठिकाणी झाडे व फांद्या पडण्याच्या घटना घडल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -