मुंबई, ठाण्याला २४ तासांचा ऑरेंज अलर्ट !

राज्यात इतर भागात पावसाने आज जोरदार हजेरी लावलेली असली तरीही मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाची जेमतेम हजेरी होती. पण मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर परिसरासाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुसळधार पाऊस, जोराचे वारे आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे. रायगडला सलग दोन दिवसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह महानगर प्रदेशासाठी (एमएमआर) भागासाठी यलो अलर्ट हवामान विभागामार्फत देण्यात आला होता. मात्र गुरूवारी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारसाठी पालघर, ठाणे, मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर विकेंडला मात्र पावसाची तीव्रता कमी होईल असा अंदाज आहे. शनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवशी पावसाची तीव्रता कमी होईल. त्यामुळे या विकेंडला ग्रीन रंग हवामान विभागाने दिलेला आहे.

उत्तर कोकणात येत्या २४ तासांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मेघगर्जनेसह मुंबई, ठाणे आणि पालघर येथे पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाला मिळालेल्या सॅटेलाईट इमेजच्या माहितीमधून येत्या २४ तासांसाठी हा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणेवासीयांनी या कालावधीत अलर्ट रहावे अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.