फेसबूक, वॉट्सअ‍ॅपच्या काळात पत्रलेखन कौशल्याची आठवण

नवी मुंबई टपाल विभागाकडून उपक्रम

Mumbai

आंतरराष्ट्रीय टपाल दिवस तसेच राष्ट्रीय टपाल सप्ताहाच्या निमित्ताने वरिष्ठ अधीक्षक डाकघर कार्यालय पनवेल यांच्यामार्फत नवीन पनवेल येथे 9 ऑक्टोबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी अभिजीत इचके, वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांचे मार्गदर्शन लाभले.

नऊ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय टपाल दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. तसेच 9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर हा राष्ट्रीय टपाल सप्ताह म्हणून भारतीय डाक विभागा मार्फत साजरा केला जातो. पत्रलेखन हे एक कौशल्य असून वॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या काळात हे कौशल्य काहीसे मागे पडले आहे. या कौशल्याचा विद्यार्थ्यांमधे विकास व्हावा या हेतूने नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी पत्र लेखनाचा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहीले असून ते पत्र पोस्टमनमार्फत त्यांच्या घरी वितरीत करण्यात येणार आहे. शाळेतील 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी या पत्रलेखन उपक्रमात सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना टपाल कार्यालयाची व तेथील कामकाजाची माहिती व्हावी या हेतूने शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट ऑफिसची क्षेत्रभेट आयोजीत करण्यात आली होती. यामधे पोष्ट ऑफिसचा काऊंटर विभाग, पोस्टमन, डाक जीवन विमा विभाग, इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांची भेट घडवून माहिती देण्यात आली.

पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह करणे हा अनेकांचा छंद असल्याने विविध स्टॅम्पचे प्रदर्शन पनवेल मुख्य पोष्ट ऑफिस येथे टपाल तिकीट संग्राहक प्रबिर बोस यांच्या सहकार्याने भरविण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांनी तसेच टपाल ग्राहकांनी या प्रदर्शनास भेट दिली.