घरमुंबईराष्ट्रवादीवर नाराज जयदत्त क्षीरसागर यांचा परिवारासह शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादीवर नाराज जयदत्त क्षीरसागर यांचा परिवारासह शिवसेनेत प्रवेश

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी आज सहपरिवार शिवसेनेत प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी आज, बुधवारी सहपरिवार शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील सेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातात शिवबंधन बांधून तसेच भगवा झेंडा घेत सेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

राष्ट्रवादीत माझ्यासह कार्यकर्त्यांचीही घुसमट झाली

शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आज सकाळीच क्षीरसागर यांनी सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत जाऊन विधानसभा अध्यक्षांना राजीनामा दिला होता. तो मंजूर झाला आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हे शिवबंधन कायम मजबूत राहील. माझा हा निर्णय खूप पूर्वी झाला आहे. एक्झिट पोल बघून प्रवेश केला नाही. उद्धव ठाकरे बाहेरगावी गेले होते म्हणून उशीर झाला. ज्याचे घर मी बांधले, पक्ष वाढवला, मोदी लाटेत मी एकटा निवडणून आलो, तरी माझी घुसमट होत राहिली. माझ्या कार्यकर्त्यांचीदेखील घुसमट झाली. सगळ्या गोष्टी असह्य झाल्यामुळे हा मी निर्णय घेतला. हा पक्ष जातपात न मानणारा पक्ष आहे. नुसत्या मराठवाड्यात नव्हे महाराष्ट्रात जिथे शक्य होईल, तिथे पक्ष वाढीचे काम करेन, असा विश्वास यावेळी जयदत्त क्षीरसागर यांनी दर्शवला.

- Advertisement -

गेल्या महिन्यात झाली होती भेट 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी आज सकाळीच अधिकृतरित्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. क्षीरसागर यांनी मुंबईत विधानसभेचे अधयक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन अधिकृतरित्या त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. त्यामुळे ते शिवसेना पक्षात प्रवेश करणार हे निश्चित झाले होते. जयदत्त क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र गेल्या महिन्यात क्षीरसागर आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली होती. ही बैठक उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर झाली होती. या बैठकीला बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि डॉ. योगेश क्षीरसागर उपस्थित होते. या बैठकीनंतर क्षीरसागर बंधू शिवसेनेत प्रवेश करणार, अशी चर्चा सुरु होती. आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -