KEM मध्ये मृत रुग्णाच्या नातेवाईकांची महिला डॉक्टरला अर्वाच्च्य शिवीगाळ; Video व्हायरल!

patient relatives abuses lady doctor in kem hospital mumbai

गेल्या ५ ते ६ महिन्यांमध्ये कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आरोग्ययंत्रणा आणि त्यामध्ये काम करणारे डॉक्टर, नर्स, सहाय्यक कर्मचारी यांच्यावर कोरोनाबाधितांवर उपचार करण्याची वेळ आली. सगळेच लॉकडाऊनमध्ये आपापल्या घरात बसलेले असताना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी मात्र रुग्णालयांत जाऊन प्रत्यक्ष कोरोना रुग्णांच्या संपर्कात येऊन त्यांना सेवा देत होते. त्यामुळे त्यांना कोरोना योद्धे संबोधलं गेलं. मात्र, याच कोरोना योद्ध्यांवर हल्ले करण्याच्या, त्यांना शिवीगाळ होण्याच्याही अनेक घटना या काळात समोर आल्या. आपला पेशंट दगावल्यानंतर रागाच्या भरात रुग्णाच्या नातेवाईकांकडून हे प्रकार घडू लागले. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईच्या KEM Hospital मध्ये घडल्याचं समोर आलं आहे. रुग्ण दगावल्यानंतर त्याला जिवंतपणीच मृत घोषित केल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी तिथे उपस्थित असलेल्या महिला निवासी डॉक्टरलाच अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करायला सुरूवात केली. तसेच, रुग्णालयात आरडाओरडा करत राडा घातल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. याबाबत रुग्णालयाकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

एका रुग्णाचे नातेवाईक महिला डॉक्टरशी अर्वाच्च्य भाषेत बोलत असून त्यांना शिवीगाळ करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच, वारंवार रुग्णाच्या छातीला हात लावून त्याच्या ह्रदयाचे ठोके सुरू असल्याचा दावा करत आहेत. तसेच, काही दृश्यांमध्ये ते थेट डॉक्टरांवर चालून गेल्याचं आणि पोलिसांना ढकलत असल्याचं देखील दिसत आहे.

नक्की घडलं काय?

रुग्णालयाकडून दिलेल्या माहितीनुसार जतिन परमार नावाच्या १८ वर्षीय तरुणाला तीन दिवस तापासाठी खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं होतं. मात्र, तिथे प्रकृती बिघडल्यामुळे त्याला ७ सप्टेंबरला रात्री ९ वाजता केईएम रुग्णालयात आणण्यात आलं. रुग्णालयात दाखल करतेवेळी रुग्णाला फिट्स आणि श्वास घेण्यात अडचण या समस्या होत्या. त्यामुळे त्याला लगेच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्याच्या नातेवाईकांना त्याची परिस्थिती समजावण्यात आली. त्याच्यावर सुरू असलेल्या उपचारांची देखील त्याच्या नातेवाईकांना वेळोवेळी माहिती दिली जात होती. ९ सप्टेंबर रोजी पहाटे १ वाजून २० मिनिटांनी रुग्णाला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचं निधन झालं. त्याचा भाऊ आणि त्याच्या मामांना इसीजीचे रिपोर्ट दाखवून त्याचं निधन झाल्याचं समोर दाखवण्यात आलं. पण १५ ते २० मिनिटांत ३० ते ४० नातेवाईक ICU मध्ये घुसले आणि त्यांना न सांगताच मृत घोषित करण्यात आल्याचा दावा करू लागले. त्यांनी ECG रिपोर्ट फाडला आणि उपस्थित महिला निवासी डॉक्टरला अर्वाच्य शिवीगाळ आणि बाचाबाची करू लागले.

रुग्ण अजूनही जिवंत असल्याचा दावा करत त्यांनी व्हेंटिलेटर पुन्हा लावण्याचा दबाव टाकला. व्हेंटिलेटर सुरू केल्यानंतर त्यावर ग्राफ्स दिसू लागल्यावर नातेवाईक अधिकच आक्रमक होत शिवीगाळ करू लागले. अंगावर धावून जाऊ लागले. मात्र, कोणताही व्हेंटिलेटर सुरू केल्यानंतर तो रुग्णाला लावलेला जरी नसला, तरी ऑक्सिजन पुरवठ्यामुळे ग्राफ्स दाखवतो. पण त्याचा चुकीचा अर्थ काढून गोंधळ घालायला सुरुवात केली. अखेर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना पाचारण केल्यानंतर त्यांनी मृत्यू कसा झाला हे विषद करून सांगितलं. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतरच रुग्णाचा व्हेंटिलेटर काढण्यात आला.