घरमुंबईकेरळला आता मदतीचा महापूर...

केरळला आता मदतीचा महापूर…

Subscribe

गेल्या 100 वर्षांतील सर्वात भीषण महापुराचा सामना करणार्‍या केरळला देशातील सर्वच स्तरातून मदतीचा हात दिला जात आहे. आता परदेशातूनही मदतीचा ओघ सुरु झाला आहे. केरळमध्ये पावसाने अक्षरश: हाहा:कार माजवला होता. पुराने वेढा घातला होता. सोमवारपासून पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आता केरळला मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे सरकारी पातळीवरुन मदत केली जात आहेच, सोबत वैयक्तिक पातळीवरही अनेकजण केरळच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आपापल्या परीने योगदान देत आहेत. केरळमधील पुरात आतापर्यंत 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 10 लाखांहून अधिक जण बेघर झाले आहेत. शिवाय, कित्येकजण अद्याप बेपत्ता आहेत.

ससूनचे २६ डॉक्टर केरळला रवाना

केरळमध्ये पाऊस आणि पुराने आतापर्यंत शेकडो बळी घेतले आहेत आणि कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या लोकांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. पुण्यातील केरळवासीयांनी ओणम सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून जमा होणारी रक्कम केरळला मदत म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आता पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून 26 डॉक्टरांची टीम केरळला रवाना झाली आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पथकात हे 26 डॉक्टर पुरग्रस्तांची आरोग्य तपासणी आणि औषध उपचार करणार आहेत. या टीममध्ये मेडिसिन पेडियट्रिक्स, गायनेकॉलोजी प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन या विभागातील तज्ञ डॉक्टर आहेत, अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले यांनी दिली आहे. त्याचबरोबर देशाच्या विविध राज्यांतून डॉक्टर्सच्या टीम केरळला दखल झाल्या आहेत. सरकारी बचाव शिबिरात 20 लाख नागरिकांनी आश्रय घेतला आहे. पुराचे पाणी कमी झाल्यावर आता केरळमध्ये साथीच्या आजारांचा प्रसार होऊ शकतो, अशी भीती वर्तवली जात आहे.

डबेवाल्यांकडून १ हजार किलो तांदूळ

केरळमध्ये पूरपरिस्थितीमुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी मुंबईतील डबेवाल्यांनीही पुढाकार घेतला आहे. जागोजागी जाऊन भूकेल्यांच्या पोटात दोन घास भरवणारा मुंबईचा डबेवाला आता केरळातील नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या नागरिकांपर्यंत अन्न पुरवण्याचे महत्त्कार्य करू लागला आहे. त्यासाठी डबेवाल्यांनी केरळमध्ये १ हजार किलो तांदूळ पाठवले. सध्याच्या संकटकाळात केरळला मदतीची गरज आहे. पेपर अ‍ॅण्ड पार्सल व डबेवाल्यांची रोटी बँक यांच्याकडून संयुक्तपणेे केरळमधील पुरग्रस्तांसाठी मदत पाठविण्यात येत आहे. एक हजार किलो तांदूळ व प्रथमोपचारासाठी औषध-गोळ्या पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली. ही मदत पेपर अ‍ॅण्ड पार्सलचे सर्वेसर्वा तिलक मेहता यांनी उपलब्ध करुन दिली आहे. कुरीअरच्या माध्यमातून ही मदत मंगळवारी लोअर परेल येथून केरळला पाठवली गेली. यावेळी पेपर अ‍ॅन्ड पार्सलचे तिलक मेहता, घनःश्याम पारेख, मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर, विठ्ठल सावंत मुकादम, कैलाश शिंदे मुकादम उपस्थित होते. दरम्यान, केरळमधील जलप्रलयाला केंद्र सरकारने गंभीर आपत्ती म्हणून घोषित केले आहे. या महापुरामध्ये आतापर्यंत 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांत पावसाची तीव्रता कमी होणार आहे.

- Advertisement -

सिद्धिविनायक मंदिराकडून एक कोटी

केरळमधील पूरग्रस्तांसाठी संपूर्ण देशभरातून मदतीचा ओघ सुरू असतानाच मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासानेही केरळसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सिद्धिविनायक मंदिराने केरळ पूरग्रस्तांसाठी एक कोटीची मदत जाहीर केली आहे. केरळ पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ’मुख्यमंत्री (केरळ पूर) सहाय्यता निधी’ स्थापन केला आहे. या सहाय्यता निधीत एक कोटीचा निधी देण्याचा निर्णय न्यास व्यवस्थापन समितीने घेतला आहे. राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच हा निधी सहाय्यता निधीत वर्ग करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापन समितीने स्पष्ट केले.
सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने यापूर्वीही नैसर्गिक आपत्तींमध्ये मदतीचा हात पुढे केलेला आहे. 2005 मध्ये रायगड आणि रत्नागिरीमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी सिद्धिविनायक मंदिराने 5 कोटी रुपये दिले होते. पुण्यात माळीण येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. त्यावेळी माळीण गावाच्या पुनर्वसनासाठी 50 लाख रुपये देण्यात आले होते. तर 2013 मध्ये दुष्काळाच्या निवारण्यासाठी मंदिराकडून 25 कोटी रुपये देण्यात आले होते.

आयआयटी मुंबईसह इतर कॉलेजांनी केली मदतीचा

केरळ येथे पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा हात पुढे येत असतानाच आता मुंबईतील विद्यार्थ्यांनी देखील या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. मुंबईतील आयआयटी मुंबईसह, सेंट झेवियर्स आणि इतर अनेक कॉलेजांनी विविध माध्यमातून केरळ पूरग्रस्तांसाठी काम सुरु केले आहे. तर अनेक विद्यार्थ्यांनी मदतीसाठी पुढे येण्यासाठी जनजागृती करण्यासही सुरुवात केल्याचे चित्र मुंबईत अनेक ठिकाणी दिसून येत आहे. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी यासाठी कॅम्पसमध्ये मानवी साखळी करीत मदतीसाठी सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधत मदत निधीत हातभार लावण्याची मागणी केली आहे. त्याबरोबरच ही मदत फक्त पैशांपुरता मर्यादित न राहता इतर आवश्यक वस्तूंच्या स्वरुपात देखील करण्यात यावी, असे आवाहन यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. तर आयआयटी मुंबईने मदतीसाठी जे तांत्रिक सहाय्य आवश्यक आहे, ते देखील देण्याची तयारी दर्शविली आहे. तर सेंट झेवियर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून यासाठी विशेष जनजागृती राबविण्यात येत आहे. या कॉलेजांबरोबरच मुंबईतील इतर कॉलेजांनी देखील जनजागृती करण्यास सुरुवात केली असून अनेक कॉलेज युवकांनी व्हॉटस ग्रुप तयार केले असून त्या माध्यमातून देखील मदतीसाठी प्रयत्न सुरु केल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

सिनेसृष्टीकडूनही मदतीचा हात

प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानने ‘मीर फाऊंडेशन’द्वारे 21 लाख, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने एनजीओ ‘हॅबिटेट फॉर ह्यूमॅनिटी इंडिया’च्या मार्फत 5 लाख, दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेता कमल हसन याच्याकडून 25 लाख, अभिनेता सूर्या याने 25 लाख, अभिनेता धनुषकडून 15 लाख, अभिनेता विशाल आणि शिवकार्तिकेयन यांनी प्रत्येकी 10-10 लाख, तेलगू स्टार विजयने 5 लाख, अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनने 1 लाख रुपये, तर ‘बाहुबली’ फेम सुपरस्टार प्रभासने केरळ रिलीफ फंडमध्ये 25 लाख रुपये दिले.अर्जुनने केरळ रिलीफ फंडसाठी 25 लाख रुपये दिले. सुपरस्टार रजनीकांत यांनीही केरळला 15 लाखांची मदत केली आहे.

 

युएईची ७०० कोटींची मदत

तिरुवनंतपुरम । पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळला संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्रप्रमुख शेख महंमद बिन राशिद अल मुकटोम यांनी तब्बल ७०० कोटींची मदत जाहीर केली, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी दिली आहे. केरळमधील महापुराच्या आपत्ती निवारणासाठी सर्वच स्तरातून मदत करण्यात येत आहे. केरळच्या मदतीसाठी देशासह जगातील इतर देशांनी पुढाकार घेतला आहे.  महापुराच्या संकटात अडकलेल्या केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीकडून (यूएई) मोठी आर्थिक मदत करण्यात आली आहे. मंगळवारी केरळमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केरळमधील महापूर, पुनर्वसन व पुनर्बांधणीसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या 30 ऑगस्टला विशेष अधिवेशन घेण्याची शिफारस राज्यपालांकडे करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -