घरमुंबईस्मार्ट सिटी प्रोजेक्टसाठी खारफुटीवर कुर्‍हाड

स्मार्ट सिटी प्रोजेक्टसाठी खारफुटीवर कुर्‍हाड

Subscribe

ठामपा आरोपीच्या पिंजर्‍यात ! कंत्राटदारावर गुन्हा दाखल

ठाणे:ठाणे महापालिकेच्या ‘ठाणे स्मार्ट सिटी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट’ या प्रोजेक्ट अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये खारफुटीच्या झाडांचा र्‍हास झाल्याचा धक्कादायक प्रकार पर्यावरण तज्ञांच्या जागरूकतेमुळे उजेडात आला आहे. याप्रकरणी खासगी कंत्राटदार कंपनीवर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेने पर्यावरण कायद्यांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा, असे आदेश कोकण विभागातील वेटलॅण्ड संदर्भात पाणथळ तक्रार समितीच्या बैठकीत कोकण विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकाही आरोपीच्या पिंजर्‍यात सापडली आहे. ठाण्याचे पर्यावरण तज्ञ व ठाणे कांदळवन समितीचे सदस्य रोहित जोशी यांच्या जागरूकतेमुळे हा प्रकार उजेडात आला आहे.

ठाणे घोडबंदर येथील भाईंदरपाडा गांधी प्लॉट रेतीबंदर येथे ठाणे स्मार्ट सिटी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट हा प्रोजेक्ट उभारला जात आहे. या प्रोजेक्टसाठी ठाणे महानगरपालिकेने मे. डी.व्ही.पी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला ९ मार्च २०१८ रोजी वर्क ऑर्डर दिली आहे. मात्र सदर कंपनीने महसूल खात्याकडून कोणतीच परवानगी न घेता, पोकलेन मशिनीच्या सहाय्याने माती भरावाचे काम सुरू केले होते. खारफुटीच्या झाडालगत हा मातीचा भराव टाकण्यात आला होता. त्यामुळे काही ठिकाणी ही झाडे भरावाखाली गाडली गेल्याने त्यांचा र्‍हास झाला आहे.

- Advertisement -

सुमारे १०७४ ब्रास मातीचा भराव करण्यात आला आहे. या भरावापासून काही अंतरावर खाडी किनारी असलेल्या खारफुटीच्या झाडांवर तसेच त्यालगत सुमारे ११ डंपर मातीचा भराव करण्यात आला आहे. हा प्रकार ठाणे कांदळवन कमिटीचे सदस्य व पर्यावरण तज्ञ रोहित जोशी यांनी बाळकूम मंडळ अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिला होता.
त्यानुसार बाळकूम तलाठी नितीन पिंगळे यांनी या जागेवर जाऊन पाहणी करून तसा पंचनामाही केला होता. तसेच तहसीलदार, वन विभागाचे अधिकारी, प्रदूषण नियंत्रण अधिकारी आणि ठाणे महापालिका अधिकारी संयुक्तपणे पाहणीसाठी हजर होते. खारफुटीचा र्‍हास झाल्याने बाळकूम विभागाचे मंडळ अधिकारी प्रशांत कापडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मे. डी. व्ही. पी इंफ्राप्रोजेक्ट कंपनीचे संचालक व कंपनीतर्फे शामकांत बोरसे व इतर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाणथळ समितीची १८ वी मासिक बैठक ४ सप्टेंबरला पार पडली. गायमुख रेतीबंदर गांधी प्लॉट भरणी संदर्भातची तक्रार समितीपुढे आली होती. त्यावेळी समितीने ठाणे महानगरपालिका जर जागेवर उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे ठाणे उपायुक्तांनी तहसीलदार यांच्यासोबत जागेची पाहणी करून तपासणी करण्याबाबतही समितीपुढे विनंती केली आहे. समितीने यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे खारफुटी र्‍हास प्रकरणावरून ठाणे महापालिका अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

सदर प्रकरणात पर्यावरणाचा र्‍हास झाल्याप्रकरणी मे. डी.व्ही. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि शामकांत बोरसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेविरोधात गुन्हे दाखल करण्यासंदर्भात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. तसेच कोकण विभागीय आयुक्तांचा आदेशही मिळालेला नाही.
-दत्तात्रय ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कासारवडवली पोलीस ठाणे.

खारफुटीचा र्‍हास होत असल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. त्यानुसार महापालिकेच्या प्रोजेक्टला न्यायालयाकडून स्थगितीही मिळालेली आहे. गायमुख येथील कांदळवनाचा र्‍हास झाल्याप्रकरणी ठाणे महापालिका जबाबदार आहे. कोकण विभागीय आयुक्तांनीही पाणथळ समितीच्या बैठकीत ठाणे महापालिकेकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने उल्लंघन केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कंत्राटदाराबरोबरच महापालिका अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सुनावणीच्या वेळी न्यायालयापुढे करणार आहे.

– रोहित जोशी, ठाणे कांदळवन समिती सदस्य. 

कोकण विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार संयुक्तपणे पाहणी करावी यासाठी महापालिकेने जिल्हाधिका-यांना पत्र दिले आहे. तहसीलदार आणि महापालिकेकडून जागेची पाहणी केली जाणार आहे. महापालिकेचा प्रोजेक्ट जेथे सुरू आहे, तेथे एका शासकीय संस्थेचे काम सुरू आहे. ज्या कोणी उल्लंघन केले आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असेही सांगण्यात आले आहे. पण त्यापूर्वी संयुक्तपणे जागेची पाहणी होणे महत्त्वाचे आहे.

– ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त ठामपा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -