अल्पवयीन मुलाने केली आईची हत्या

भाऊ आणि वडिलही कटात सामील

Vasai
hasband killing his wife for dowry in mumbai
प्रातिनिधिक फोटो

बापावर असलेल्या आंधळ्या प्रेमापोटी दोन भावांनी आपल्या आईचीच हत्या करून प्रेताची विल्हेवाट लावल्याची घटना उघडकिस आली आहे. नालासोपारा पश्चिमेकडील गोगटे सॉल्ट जवळील नाल्यात 21 जानेवारीला एका महिलेचा मृतदेह आढळला होता. गळ्यावर, पोटावर, पाठीवर वार करून हा खून करण्यात आला होता. मृतदेहाच्या कपड्यात सापडलेल्या एका कागदावर पुसटशा अक्षरात मोबाईल नंबर लिहीलेला आढळून आला होता. तो नंबर कोपरखैरणे येथील एका कंपनीच्या मालकाचा असल्याचा शोध पोलिसांनी लावला होता. मात्र त्या मालकाने आपण या महिलेला ओळखत नसल्याचे सांगितले. त्यामुळे कौपरखैरणेतच आपला तपास सुरू ठेवल्यानंतर पोलिसांनी यश आले. हत्या झालेली महिला ही नालासोपारातील असून तिचे नाव कुसूम प्रजापती असल्याची माहिती त्यांना तेथील एका इसमाने दिली. त्यानंतर कुसुमच्या कुटुंबाचा पोलिसांनी तपास केल्यावर ती नवर्‍यापासून विभक्त रहात असल्याची माहिती त्यांना मिळाली. तसेच ती रहात असलेले संतोष भवन हवाईपाडा येथील घर पतीच्या नावावर असल्याचेही त्यांना कळले. त्यामुळे पती मिलन नावाच्या इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्हा उघड झाला.

कुसूम विभक्त झाल्यानंतर तिची मुले वडीलांकडेच रहायला होती. दोन वर्षे विभक्त राहिल्यावर मिलनने कुसूम रहात असलेले घर विकले होते. मात्र कुसूम ताबा सोडायला तयार नव्हती. त्यामुळे वडीलांची ही समस्या अल्पवयीन मुलगा महेशकुमारने ‘अशा पद्धतीने’ सोडवायचे ठरवले. त्यानंतर वडील, मुलगा आणि चुलत भाऊ अशा तिघांनी कुसूमच्या हत्येचे षडयंत्र रचले. वडीलांवर असलेल्या आंधळ्या प्रेमापोटी मग मुलानेच आईचा काटा काढला आणि ओळख पटू नये यासाठी तिचा मृतदेह निर्जन ठिकाणी टाकला. या कृत्यानंतर प्रजापती पिता-पुत्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्याला भिवंडीच्या बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.