घरमुंबईमिठीची पूररेषा घसरली, घराघरात शिरले पाणी!

मिठीची पूररेषा घसरली, घराघरात शिरले पाणी!

Subscribe

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने मिठी नदीची पातळी २.८ मीटर होताच घराघरांमध्ये पाणी शिरले. यावरून १४ वर्षांपूर्वी निश्चित केलेली मिठीची पूररेषा आता वाढवण्याची गरज बनली आहे.

तब्बल १४ वर्षांपूर्वी झालेल्या २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीचे रुंदीकरण करून तिची खोली वाढवण्यात आली, परंतु तेव्हा निश्चित केलेली नदीची पूररेषा आता कमी झालेली आहे. कुर्ला क्रांतीनगर परिसरातील मिठी नदीच्या पात्रात ३.३ मीटर ही धोक्याची पातळी मानली जाते, मात्र बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने मिठी नदीची पातळी २.८ मीटर होताच घराघरांमध्ये पाणी शिरले. यावरून १४ वर्षांपूर्वी निश्चित केलेली मिठीची पूररेषा आता वाढवण्याची गरज बनली आहे, त्याकरता नव्याने सर्वे करण्याची आवश्यकता आहे.

धोक्याच्या पातळीपूर्वीच मिठीला पूर

बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसात दुपारी दीडच्या सुमारास कुर्ल्यातून जाणार्‍या मिठी नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली, त्यामुळे क्रांती नगरमधील सुमारे ४५० लोकांना नेव्ही आणि नौदलाच्या मदतीने बाहेर काढून येथील महापालिका शाळेत स्थलांतरीत केले. मिठी नदीलाच पूर आल्याने येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावरही पाणी जमा झाले होते. मिठी नदीच्या पाण्याने ३.३ मीटर एवढी धोक्याची पातळी गाठल्यानंतरच क्रांती नगर परिसरात पाणी तुंबते, तसेच लाल बहादूर शास्त्री मार्गावर पाणी जमा होण्यास सुरुवात होते. परंतु बुधवारी २.८ एवढी पाण्याची पातळी असतानाच क्रांती नगरसहीत एलबीएस मार्गावर पाणी जमा होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे धोक्याच्या पातळीपूर्वी मिठीला पूर येऊन येथील भागांमध्ये पाणी जमा होत असल्याची बाब समोर आली.

- Advertisement -

तलावाच्या पाण्यामुळे मिठीला पूर येतो

महापालिकेच्या एल विभागाचे सहायक आयुक्त मनिष वळंजू यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मिठी नदीच्या क्रांती नगर परिसरात धोक्याची पातळी ३.३ मीटर मानली जाते, परंतु बुधवारी २.८ मीटर एवढी पाण्याने पातळी गाठताच परिसरात पाणी जमा होऊ लागले. या भागातील कुटुंबांना शाळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केल्यानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजता ही कुटुंबे आपापल्या घरी गेली. यावरून २००५ नंतर वर्तविण्यात येणारा मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीचा अंदाज चुकीचा ठरताना दिसत आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे विहार तलाव आणि पवई तलाव ओसंडून वाहू लागल्याने त्याचे पाणी मिठी नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे मिठी नदीला पूर येतो. त्यामुळे पवई तलावाच्या पाण्याचा वापर केला जात नसून ते भरल्यानंतर मुंबईला धोकाच निर्माण होतो. त्यामुळे हे पाणी विशेष वाहिनीद्वारे ऐरोलीच्या खाडीत सोडले जावे, अशी सूचना तज्ज्ञांकडून केली जात आहे.

हेही वाचा – शिवसेना भवन ते सिध्दीविनायक मंदिर नवीन बस मार्ग

संरक्षक भिंतीमुळे मिठीची पाणी पातळीची क्षमता घटली

२००५ मध्ये दोन समित्यांच्या अभ्यासानंतर अहवाल बनवण्यात आला होता. परंतु त्यानंतर केंद्रीय पर्यावरण खात्यानेही २०१५ साली आपला अहवाल देत अशाप्रकारे पाऊस वाढतच जाणार असल्याचे म्हटले आहे. परंतु या अहवालाची अंमलबजावणी केली जात नाही. मिठी नदीला घातलेल्या संरक्षक भिंतीमुळे पाण्याच्या पातळीची क्षमता कमी होत आहे. शिवाय माहिमला मिठी नदीचे मुख आहे, ते अरुंद आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह जलदगतीने होत नाही. परिणामी पाणी मागे सरकून कुर्ला आदी भागांमध्ये तुंबते. म्हणून अहवालांमध्ये त्रुटी असून तिवरांच्या तसेच ना विकास क्षेत्रांच्या जागांवर होत असलेल्या बांधकामांमुळे मिठी नदीला पूर येतो. आसपासच्या भागांमध्ये पाणी तुंबते, असे वॉचडॉग फाऊंडेशनचे संस्थापक गॉडफ्रे पिमेंटा यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

- Advertisement -

बामनदाया पाडाही जलमय

मिठी नदीला पूर आल्यावर कुर्ल्यातील क्रांती नगर भागातील लोकांना बाहेर काढले जाते. मात्र, आजवर याच भागाला मिठी नदीच्या पुराचा फटका बसत असल्याचे दिसून आले आहे. परंतु बुधवारी झालेल्या पावसात बामनदाया पाड्यालाही पुराचा फटका बसला. मिठी नदीला पूर आल्याने या पाड्यात पाणी शिरुन सुमारे ५०० घरांमधील ८०० कुटुंबांना बाहेर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे लागले. बुधवारी स्थानिक नगरसेवक व महापालिकेच्या कामगारांच्या मदतीने तेथील लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मिठी नदीच्या पुरामुळे आता क्रांतीनगर बरोबरच बामनदाया पाड्याकडेही महापालिकेला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -