घरमुंबईआधुनिक कचरापेट्या की जाहिरातीचा डिस्प्ले ?

आधुनिक कचरापेट्या की जाहिरातीचा डिस्प्ले ?

Subscribe

कचरा मार्शल योजना असफल झाल्यानंतर आता कचर्‍याच्या प्रश्नावर ठामपाने पुन्हा नवीन योजना अंमलात आणली आहे. नागरिकांनी कचरापेटीचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यासाठी आधुनिक कचरापेट्या ठेवण्यात आल्या आहेत. नियमितपणे कचरापेटीचा वापर करणार्‍या नागरिकांसाठी ‘कचरा टाका आणि सोने जिंका’ अशी योजना प्रशासनाने खासगी संस्थेच्या माध्यमातून सुरू केली आहे. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीबाबत ठाणेकरांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. घनकचरा विभागातील कचरापेट्यांची दुर्दशा पाहता या आधुनिक कचरापेट्या किती दिवस टिकणार आहेत,असा प्रश्न विचारला जात आहे.

काही महिन्यांपूर्वीच नवीन प्रकारच्या कचरापेट्या बसवण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये प्लास्टीक बॉटल क्रॅश करण्यात येणार होत्या. त्यानंतर लगेच या नवीन प्रकारच्या आधुनिक कचरापेट्या शहरात बसवण्यात आल्या आहेत. या कचरापेट्या कमी पण जाहिरात डिस्प्ले जास्त वाटत आहेत. यासाठी लागणारा विद्युतप्रवाह महापालिका करणार असेल तर यावर होणार्‍या जाहिरातींचा मलिदा कोण घेणार आहे हेही गुलदस्त्यातच आहे. याचा अर्थ ही योजना म्हणजे ठेकेदारांच्याआडून राज्यकर्त्यांचा कमविण्याचा आणखीन एक नवा फंडा असल्याचे मत ठाणेकर व्यक्त करीत आहेत.

- Advertisement -

अशा असतील कचरापेट्या

टेकबीन या अ‍ॅपद्वारे याजवळ असलेल्या कचरापेट्यांची माहिती नागरिकांना मोबाईलवर मिळेल. त्यानंतर या आधुनिक कचरापेटीत कचरा टाकल्यावर एलईडी पडद्यावर आलेल्या ‘क्युआर कोड’चा अ‍ॅपमधील कॅमेर्‍याने फोटो काढून तो कोड टेकबीनच्या सर्व्हरला पाठवावा लागेल. ज्यामुळे संबंधित नागरिक टेकबीनचा वापर करत असल्याची नोंद होणार. त्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून विजेत्यांची निवड करून त्यांना सोन्याचे नाणे बक्षीस रूपात देण्यात येणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या एकूण दोनशे आधुनिक कचरापेट्या ठेवल्या जाणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील सुमारे शंभर कचरापेट्या विविध ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. या कचरापेटीसाठी तीन चौरस फुट जागा लागणार असून त्यात ओला व सुका कचरा टाकण्यासाठी दोन स्वतंत्र कप्पे तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये कचरा साठवणुकीसाठी पिशवी ठेवण्यात आली असून ती भरल्यानंतर मोठ्या कचरापेटीत टाकली जाणार आहे किंवा कचरा वाहतूक गाडीतून ती नेली जाणार आहे.

महापालिका प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ राहावीत यासाठी प्रयत्न केले जात असून त्यासाठी विविध उपक्रमही राबविले जात आहेत. जनजागृती अभियान राबविले जात आहेत. त्यानंतरही स्वच्छ शहरांच्या यादीत ठाण्याचा क्रमांक वधारत नाही असा अनुभव आहे. यावर पर्याय म्हणून सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या कचरापेट्यांमध्ये कचरा टाकण्याऐवजी कुठेही टाकण्याच्या नागरिकांच्या सवयीला लगाम घालण्यासाठी ठाणे महापालिकेने ही योजना आणली आहे. या कचरा पेटीचा जास्तीत जास्त तसेच नियमितपणे वापर केल्यावर अनेक कंपन्यांच्या वेगवेगळ्या सवलतींचा लाभही नागरिकांना मिळणार आहे.
– मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण अधिकारी ठामपा

- Advertisement -

या योजनेमध्ये संबंधित ठेकेदाराकडून विजेत्यांची निवड करून त्यांना सोन्याचे नाणे बक्षीस रूपात देण्यात येणार आहे. ठाण्यात ठेकेदारी पद्धती काय आहे हे सर्व जगाला माहित आहे. ठेकेदार कुणासाठी काम करतात. त्यांचे बोलविता धनी कोण असतात हे पाहिले तर ही सोन्याची नाणी कुणाच्या खिशात जाणार आहेत हे काही सामान्य नागरिकाला कळत नाही का? हा तर नागरिकांच्या कराच्या पैशाचा अपहारच आहे. स्वच्छता मार्शलच्या ठेकेदारीचे काय झाले याचे उत्तर पालिकेने पहिले द्याव आणि घनकचरा विभागातील भ्रष्टाचार दूर करावा त्यामुळे संपूर्ण ठाणे स्वच्छ होण्यास मदत होईल.
– प्रमोद प्रल्हाद इंगळे, सामाजिक कार्यकर्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -