पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरण कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये आणि ग्राहकांच्या अडचणी तात्काळ सोडवाव्यात असे आदेश विजयकुमार काळम पाटील यांनी दिले आहेत.

Kalyan
MSEB
महावितरण

“कल्याण प्रादेशिक कार्यालयांतर्गत होणाऱ्या वीज हानीमुळे महावितरणचा दर महिन्याला मोठा महसूल बुडतो. यामुळे वीज देयक वसूलीवर आणि जास्त वीजहानी असणाऱ्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये आणि ग्राहकांच्या अडचणी तात्काळ सोडवाव्यात.” असे आदेश महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील यांनी दिले आहेत.

महावितरणच्या कल्याण परिमंडळात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, भांडुप नागरी परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, कोकण परिमंडळाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे व प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत कार्यरत सर्व अधीक्षक अभियंता उपस्थित होते. यावेळी फिल्डवरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने सर्व मुख्य अभियंत्यांनी सहव्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील यांचे स्वागत केले.

विजयकुमार काळम पाटील पुढे म्हणाले, “परिमंडळ, मंडळ व विभागीय कार्यालयांनी आयएसओ मानांकन मिळवण्याचा प्रयत्न करावा. ज्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांच्यात जनतेच्या अडी-अडचणी शिस्तबद्ध पद्धतीने, कार्यक्षमपणे, वेळेत सोडवण्याची प्रवृत्ती वृद्धिंगत होईल. तसेच एसओपीप्रमाणे काम केल्याने कामाचा दर्जा व वेग उत्तम राहील. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची अडचण सोडवावी. फिल्डवर कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यातील जास्तीत जास्त अडचणी सोडवण्यात येतील. फिल्डवरील कर्मचाऱ्यांनी नियमितपणे महावितरणचा युनिफॉर्म वापरावा. याचबरोबर कर्मचाऱ्यांनी वसुली, ग्राहकसेवा, वीजचोरी विरोधात मोहीम राबवणे, फॉल्टी मीटर बदलणे आदी कामे गांभीर्याने करावीत. कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.” यावेळी कल्याण, नाशिक, भांडुप, कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता यांनी विविध मुद्यांवर सादरीकरण केले.