पालघर, शहापूरमध्ये वीजचोऱ्या उघडकीस

power theft

महावितरणच्या पालघर विभागात वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येत आहे. ७ ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या या मोहिमेत ६११ वीज जोडण्यांची तपासणी करून ८२ जणांकडील वीजचोरी उघडकीस आणली आहे. जवळपास सव्वादहा लाख रुपयांच्या ६६ हजार युनिट वीज चोरीप्रकरणी संबंधितांविरुद्ध विद्युत कायदा- २००३ अन्वये कारवाई सुरु आहे. ही मोहीम नियमित सुरु राहणार असून कटू कारवाई टाळण्यासाठी अधिकृत जोडणी घेऊनच वीजवापर करावा असे महावितरणने केले आहे.

पालघर विभाग कार्यालयांतर्गत पालघर, बोईसर ग्रामीण व एमआयडीसी, डहाणू, जव्हार, सफाळे, तलासरी, मोखाडा आणि विक्रमगड उपविभागातील ६११ वीजजोडण्यांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली. यात ७८ ठिकाणी वीजचोरी तर चार ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर सुरु असल्याचे आढळून आले. याशिवाय ११ ग्राहकांच्या मीटर रीडिंगची अचूक नोंद त्यांच्या वीजबिलात झाली नसल्याचे निदर्शनास आले. ६६ हजार युनिट वीज चोरी प्रकरणी संबंधीत ७८ जणांविरुद्ध विद्युत कायदा-२००३ च्या कलम १३५ तर चार जणांविरुद्ध कलम १२६ नुसार कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरी संदर्भात जवळपास १० लाख १७ हजार रुपयांची वीजबिले भरण्याची नोटीस संबंधितांना बजावण्यात येत असून या वीजबिलाचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी फिर्याद देण्यात येईल. वीजचोरीला प्रतिबंध करण्यासाठी ही मोहीम नियमितपणे राबविण्यात येणार आहे. मोहिमेत वीज मीटरमधील छेडछाड शोधून अचूकपणे वीजचोरी पकडण्यासाठी ऍक्यूचेक मीटरचा वापर करण्यात येत आहे. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल व पालघर मंडलाच्या अधीक्षक अभियंता किरण नगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रताप मचिये व डहाणू, पालघर, जव्हार, बोईसर, सफाळे, तलासरी, मोखाडा, विक्रमगड उपविभागीय कार्यालयाच्या उपकार्यकारी अभियंत्यांसह स्थानिक अभियंते, कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत.

शहापूरमध्ये १३ जणांवर कारवाई

महावितरणच्या शहापूर उपविभागीय कार्यालयाने गेल्या तीन दिवसात वीजचोरांविरुद्ध मोहीम उघडली असून १३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत साडेदहा लाख रुपयांची ८० हजार युनिट विजेची चोरी उघडकीस आली. वीज चोरीविरुद्ध अधिक तीव्रपणे मोहीम राबविण्याच्या सूचना मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. तर विजेच्या अनधिकृत वापरापासून दूर राहून संभाव्य कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहनही अग्रवाल यांनी केले आहे. शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या नेतृत्वाखाली सहा अभियंते, सहायक लेखापाल, अठरा जनमित्र यांच्या पथकाने मंगळवारी शेणवा येथे तपासणी करून दोन वीज चोरांविरुद्ध कारवाई केली. तर बुधवारी पहाटे पाच वाजता पाली गावात मोहीम राबवून नऊ वीजचोरांना रंगेहाथ पकडले. तर गुरुवारी किन्हवली येथे केलेल्या तपासणीत दोन जणांकडे विजेचा चोरटा वापर आढळून आला. जवळपास ८० हजार युनिट वीजचोरी प्रकरणी संबंधितांना सुमारे साडेदहा लाख रुपयांची वीजबिले देण्यात येत आहेत. वीजचोरीच्या बिलांचा भरणा न केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाईसाठीची प्रक्रिया करण्यात येईल असे महावितरणने स्पष्ट केले आहे.