धक्कादायक! स्वयंपाकाच्या वादातून केली सहकाऱ्याची हत्या अन् मृतदेह पुरला

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

स्वयंपाक कोण करणार या वादातून सहकाऱ्याची हत्या करून मृतदेह बांधकामाच्या ठिकाणी पुरण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत उघडकीस आली आहे. याप्रकरणी महात्मा जोतिबा फुले चौक पोलिसानी दोघांना अटक केली आहे. या दोघांविरुद्ध हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी घडली घटना

कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरात असलेल्या रेल्वे वर्कशॉप या ठिकाणी रेल्वे कँटीनसाठी नवीन इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामाच्या ठिकाणी भटके कुत्रे आणि डुकराने उकरलेल्या मातीतून एक मानवी मृतदेह शनिवारी सकाळी मिळून आला होता. महात्मा ज्योतिबा फुले चौक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी रुखीमीबाई रुग्णालय येथे पाठवण्यात आला.

दरम्यान पोलिसांनी बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या मजुरांकडे चौकशी केली असता बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारणारा मुकेश पोरेड्डीवार हा दोन दिवसापासून गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृतदेहाजवळ मिळून आलेल्या कपड्यावरून मुकेश पोरेड्डीवार (४५) याचाच मृतदेह असल्याची ओळख पटवण्यात आली.

मुकेश पोरेड्डीवार हा मूळचा गडचिरोली येथे राहणारा असून काही महिन्यापासून तो मजुरीचे काम करण्यासाठी या ठिकाणी आला होता. मुकेश सोबत राहणारा त्याच्याच गावाकडील बबलू उर्फ गुलामअली खान हा देखील दोन दिवसांपासून बेपत्ता असून या दोघांत नेहमी स्वयंपाक कोण करणार या वादातून दोन दिवसांपूर्वी भांडण झाले होते अशी माहिती येथील मजुरांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी बबलू उर्फ गुलामअली याचा शोध घेऊन उल्हासनगर येथुन त्याला आणि त्याचा दुसरा साथीदार अकिल अहमद खान याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांनी गुन्हा कबूल केला.

मुकेश आणि बबलू उर्फ गुलामअली यादोघांनी दारूच्या नशेत मुकेशच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून त्याची हत्या केली आणि मृतदेह बांधकामाच्या ठिकाणी पाया भरणीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पुरला होता अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत पुढे आली. याप्रकरणी महात्मा ज्योतिबा फुले चौक पोलिसानी हत्या आणि पुरवा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, महात्मा ज्योतिबा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संभाजी जाधव ,सपोनि सरोदे आणि पथक यांनी केला.


मुंबईची बत्ती गुल होणार, जोफ्रा आर्चरने आधीच केलं होतं भाकीत