घरमुंबईविदेशी दूतावासातील अधिकार्‍याची ऑनलाईन लूट

विदेशी दूतावासातील अधिकार्‍याची ऑनलाईन लूट

Subscribe

अडीच कोटींचा गंडा, घरदार विकून रस्त्यावर

१८ लाख अमेरिकन डॉलरचे आमिष दाखवून एका विदेशी दूतावास कार्यालयातील व्हिसा अधिकार्‍याचे सर्वस्व लुटून सायबर गुन्हेगारांनी त्याला रस्त्यावर आणल्याचा प्रकार ठाणे जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या आमिषापोटी या अधिकार्‍याने आपले राहते घर विकून तसेच लोकांकडून या सायबर गुन्हेगारांना कधी रोखीने तर कधी नेटबँकिंगच्या माध्यमातून अडीज कोटी रुपये दिले. आपली फसवणूक झाल्याचे खूप उशिरा या अधिकार्‍याच्या लक्षात आल्यानंतर त्याने आपल्या पत्नीच्या मार्फत कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हे अधिकारी पत्नी आणि मुलासह कल्याणच्या खडकपाड्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहत होते. वर्षभरापूर्वी त्यांना फेसबुकवर मरियम नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. या अधिकार्‍याने ती रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर दोघांचा परिचय होऊन मैत्री झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल फोन क्रमांक एकमेकांना पाठवले. दोघात बोलणे सुरू झाले असताना मरियम नावाच्या महिलेने स्वतःची ओळख अमेरिकन नागरिक असल्याची दिली. तसेच, तिचे पती अमेरिकन सैन्यात होते व ते युद्धात मारले गेले, असे तिने या अधिकार्‍याला सांगितले.

- Advertisement -

तसेच सध्या ती तेहरान, इराण येथे तिच्या १२ वर्षांच्या मुलासोबत राहते व तिचा दीर तिला लग्नासाठी बळजबरी करीत आहे. मात्र, तिला त्याच्यासोबत लग्न करायचे नसून तिला मुलासोबत भारतात स्थायिक व्हायचे आहे. त्यासाठी मला मदत करा, असे मरियमने या अधिकार्‍याला सांगितले. तिच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने त्याने तिला मदत करण्याचे आश्वासन दिले. तिच्याकडे तिच्या पतीने मृत्यूपूर्वी बचत केलेले १८ लाख अमेरिकन डॉलर असून, ते भारतात आणण्यासाठी मला मदत करावी, मी भारतात येऊन ते सर्व ताब्यात घेईन, अशी विनंती तिने केल्यामुळे या अधिकार्‍याने तिला होकार दिला.
त्यानंतर काही आठवड्यांनी या अधिकार्‍याला दिल्ली येथून एक फोन आला. फोन करणार्‍याने आपण कस्टम अधिकारी असल्याचे सांगून मरियम नावाच्या महिलेने तुमच्या नावावर एक बॉक्स पाठवला असल्याचे सांगून तो सोडवण्यासाठी २ लाख रुपये ‘कर’ अँटी टेररिस्ट कोडसाठी ४ लाख आणि वाहतूक खर्च ८० हजार असे एकूण ६ लाख ८० हजार भरण्यास सांगितले. त्यानंतर या अधिकार्‍याने कस्टम अधिकार्‍याने दिलेल्या खात्यात ही रोकड जमा केली.

काही दिवसांनी जॉनस स्कॉटन नावाच्या इसमाने फोन करून मी सांताक्रूझ विमानतळ येथून बोलत असून, तुमचे पार्सल घेऊन तुमच्या घरी येतो असे सांगितले.मध्यरात्री या अधिकार्‍याच्या घरी एक निग्रो आला व त्याने स्वतःची ओळख जॉनस स्कॉटन अशी सांगितली. त्याने सोबत आणलेला एक बॉक्स समोर ठेऊन या अधिकारी आणि त्यांच्या पत्नीच्या समोर उघडला. त्यात एक कापसात गुंडाळलेली बॉटल आणि काही नोटांची बंडल होती. मात्र, कापसात गुंडाळलेली बॉटल फुटल्यामुळे त्यातील लिक्विड सांडले. त्यामुळे नोटांवरील काळे डाग काढता येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर जॉनस स्कॉटन याने कापसावर सांडलेल्या लिक्विडने काही नोटांवरील डाग काढून दाखवले. हे लिक्विड विकत घ्यावे लागेल, असे सांगून जॉनस तेथून निघून गेला.

- Advertisement -

दुसर्‍या दिवशी पुन्हा या अधिकार्‍याला जॉर्ज कारा नावाच्या व्यक्तीने फोन करून अर्धा लिटर लिक्विडची किंमत १५ लाख आणि एक लिटर लिक्विडची ३० लाख रुपये सांगितली. दरम्यान, लिक्विडच्या नावाखाली तसेच विविध कारणे सांगून या अधिकार्‍याकडून सुमारे अडीज कोटी रुपये उकळले. या अधिकार्‍याने आपले राहते घर, बँकेतील जमा रक्कम तसेच कर्ज काढून त्यांची मागणी पूर्ण केली. अखेर त्यांना या प्रकरणाचा संशय आल्यामुळे त्यांनी मरियमला फोन केला असता तिचा फोन बंद होता. त्यानंतर ज्या ज्या व्यक्तींनी या अधिकार्‍याला फोन केले होते ते सर्वांचे फोन बंद झाले होते. आपली फसवणूक झाल्याचे कळताच या अधिकार्‍याच्या पत्नीने अखेर गुरुवारी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. खडकपाडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांच्या मदतीने सुरू असल्याचे पोलिसानी सांगितले.

एका विदेशी दूतावासात काम करणार्‍या अधिकार्‍याला लाखो अमेरिकन डॉलरचे आमिष दाखवून त्यांची अडीज कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आमची दोन पथके या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. लवकरच या गुन्ह्याची उकल करण्यात येईल.
– बाळासाहेब कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकपाडा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -