डोंबिवलीत भोपाळकांडची भिती : अतिधोकादायक कंपन्यांबाबत निर्णय घेण्याची मागणी

Dombivali
dombivali fire

एमआयडीसीमधील घातक केमिकल कंपन्यांमुळे वारंवार लागणाऱ्या भीषण आगींमुळे डोंबिवलीत भोपाळकांड होण्याची भिती आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळणारे प्रदूषणनियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच शहरातील पाचही अतिधोकादायक कंपन्यांचाही निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

डोंबिवली शहरात गेल्या चार वर्षात १८ कंपन्यांना भीषण आगी लागल्या आहेत. या आगीत अनेकांना जीव गमवावा लागला असून अनेकजण जखमी झाले आहेत. मात्र, यातून कंपनी व्यवस्थापनाने कोणताही धडा घेतलेला नाही. सरकारी यंत्रणेकडूनही कानाडोळा केला जात असल्याने नागरिकांबरोबर कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. मेट्रो पॉलिटन कंपनीच्या आवारात भीषण आग लागली त्यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या समवेत मी स्वत: घटनास्थळी उपस्थित होतो. एमआयडीसीत कंपन्यांना वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. शहरातील प्रदूषणाची आजतागायत कोणीच दखल घेतली नव्हती. मात्र, प्रदूषणाने इथला रस्ता गुलाबी झाल्यानंतर, एक संवेदनशील आणि कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून आपण स्वत: येऊन पाहणी केली, त्यावर कायमस्वरूपी उपायोजन करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यावर कुठलीही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शहरातील पाच अति धोकादायक कंपन्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे, याकडे केणे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.