घरमुंबईमुंबईचा अजून विस्तार होणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईचा अजून विस्तार होणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंगळवारी कल्याणमध्ये मेट्रोच्या ५ आणि ९व्या लाईनच्या कामाचं आणि नवी मुंबईतल्या परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पाचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुंबईवरचा वाढता ताण आणि त्यासाठी सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना, यावर त्यांनी प्रकाश टाकला.

‘भारतात वेगाने शहरीकरण होत आहे. येत्या १० वर्षांत जगातल्या सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये सर्वच्या सर्व १० शहरं भारतीय असतील. त्यासाठी शहरात राहाणाऱ्या लोकांचा मोठा हात राहिला आहे. त्यामुळेच येत्या काही वर्षांमध्ये मुंबईचा देखील अजून विस्तार होणार आहे. त्यासाठी आम्ही इथल्या सोयी सुविधांकडे लक्ष दिलं आहे,’ अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कल्याणमध्ये दिली. मेट्रो ५ आणि ९चं उद्घाटन आणि नवी मुंबईत परवडणाऱ्या ९० हजार घरांच्या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘मुंबई आणि ठाण्याने देशाची स्वप्न साकार करण्यासाठी मदत केली आहे. इथे राहाणाऱ्यांचं ह्रदय मोठं आहे. जो इथे येतो, तो मुंबईच्या रंगात रंगून जातो. पण त्यामुळेच इथल्या सोयी सुविधांवर ताण वाढत आहे. त्यामुळेच गेल्या ४ वर्षांमध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत’, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

मोदींनी केली मराठीत सुरुवात!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रभूमीला मी प्रणाम करतो. महाराष्ट्राच्या बाबासाहेब भीमराव आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू महाराज या सुपुत्रांना मी वंदन करतो. संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत अनेक महान संतांनी भक्तीमार्गाने लोकांना जोडण्याचं काम केलं आहे. इथल्या पवित्र मातीने तानाजी मालुसरे, बाजी प्रभू, अहिल्याबाई होळकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर असे अनेक रत्न दिले आहेत. महाराष्ट्राच्या या सर्व महान विभूतींना मी नमन करतो. ही आशा अपेक्षांती भूमी आहे., स्वप्न पूर्ण करणारी नगरी आहे. प्रत्येक क्षेत्रात देशाचं नाव उंच करणारी भूमी आहे. आपणा सर्वांना माझा नमस्कार.

- Advertisement -

४ वर्षांत मुंबईत २७५ किमीची मेट्रो!

मेट्रोची पहिली लाईन २००६मध्ये सुरू झाली. पण ८ वर्ष सगळं अडकून राहिलं. २०१४मध्ये ही लाईन फक्त ११ किलोमीटरपर्यंतच वाढली. आम्ही २०१४मध्ये यावर भर देण्याचा निर्णय घेतला. आता येत्या ३ वर्षांत इथे ३५ किलोमीटरची क्षमता निर्माण होईल. २०२२मध्ये एकट्या मुंबईत तब्बल २७५ किलोमीटरची मेट्रो सुरू होईल. या मेट्रोमुळे पूर्ण मुंबईतल्या ट्रॅफिकच्या समस्येवर उपाय शोधला जाईल. २०३५चं लक्ष्य ठेऊन हे प्रकल्प केले जात आहेत.

‘हमारे संस्कार, सरोकार और रफ्तार अलग!’

२०२२मध्ये देशातल्या प्रत्येक कुटुंबाकडे स्वत:चं घर असायला हवं. त्यासाठी आज ९० हजार नवीन घरं बनवण्याची सुरूवात झाली आहे. ३ वर्षांमध्ये ही घरं बनवून तयार होणार आहेत. आधीच्या सरकारच्या तुलनेत ‘हमारे संस्कार, सरोकार और रफ्तार’ वेगळे आहेत. मागच्या सरकारने आपल्या शेवटच्या ४ वर्षांमध्ये फक्त २५ लाख ५० हजार घरं बनवली. पण गेल्या ४ वर्षांत आम्ही सुमारे १ कोटी २५ लाखांहून अधिक घरं बांधली. म्हणजेच पाच पट जास्त. एवढं काम त्यांना करायचं असतं, तर कदाचित २ पिढ्या निघून गेल्या असत्या.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – काळे कपडे घातलेल्यांना मोदींच्या सभेत ‘नो एंट्री’!

‘काँग्रेस सरकारसारखी आदर्श सोसायटी बनवणार नाही’

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ८ लाख लोकांसाठी घरं बांधली गेली. बेघर लोकांसाठी इथे एक आदर्श सोसायटी बनवली जात आहे. पण इथे जुन्या सरकारसारखी आदर्श सोसायटी नाहीये. खऱ्या अर्थाने आदर्श सोसायटी बनवली जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपये थेट गृहकर्जाच्या खात्यामध्ये जमा केली जाते. आधीच्या तुलनेत गृहकर्जाचं व्याज देखील कमी झालं आहे. शिवाय अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातल्या लोकांना गृहकर्जाच्या व्याजावर सबसिडी देखील दिली जात आहे. त्यामुळेच गेल्या दीड वर्षांत लाखो लोकांनी आपलं पहिलं घर खरेदी केलं आहे.

महाराष्ट्र रेरामध्ये अग्रेसर!

चार वर्षांपूर्वीपर्यंत नवीन खरेदी केलेलं घर मिळवण्यासाठी फार त्रास होत होता. चुकीचे नियम आणि काही लोकांचा मनमानी कारभार यामुळे मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यावर उपाय म्हणून रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजेच रेरा आम्ही आणला. महाराष्ट्राने देखील सगळ्यात आधी रेरा लागू केला. देशातले सुमारे ३५ हजार प्रोजेक्ट आणि २७ हजार एजंट रेराअंतर्गत रजिस्टर झाले आहेत. यातही महाराष्ट्र अग्रेसर आहे. आधी जर असा कायदा झाला असता, तर खरेदीदारांना घरांसाठी पायपीट करावी लागली नसती.

एलईडी बल्बमुळे १६ हजार कोटींची वीजबिल बचत

गरिबांचं वीजबिल कमी करण्यासाठी देशभरात सुमारे ३० कोटी एलईडी बल्ब वाटले गेले आहेत. त्यातले २ करोड बल्ब एकट्या महाराष्ट्रात वाटले गेले. त्यामुळे वीजही वाचवली जात असून त्याचं बिलसुद्धा कमी येत आहे. त्यामुळे वीजबिलामध्ये महाराष्ट्रात एकूण ११०० कोटींचं तर देशभरात १६ हजार कोटींचं वीजबिल कमी झालं आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्री साधणार व्हिडिओ कॉन्फरन्सवर ‘लोक संवाद’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -