…म्हणून शिवसेनेला मत देऊ नका – राज ठाकरे

मुंबईत झालेल्या जाहीर सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली.

Mumbai
Raj Thackeray Speech in Mumbai
राज ठाकरेंची मुंबईत जाहीर सभा

मुंबईतलं लोकसभा निवडणुकांसाठीचं मतदान अवघ्या काही दिवसांवर आलेलं असतानाच राज ठाकरेंनी त्यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ स्टाईलमध्ये मुंबईत सभा घेतली. मुंबईच्या काळाचौकी परिसरातल्या शहीद भगतसिंग मैदानात त्यांनी ही सभा घेतली. यावेळी त्यांनी अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर टीका केली. तसेच, त्यांच्या ‘स्टाईल’मध्ये मोदींवर निशाणा साधला. मात्र आजच्या राज ठाकरेंच्या भाषणातला सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा ठरला तो म्हणजे त्यांनी शिवसेनेवर केलेली टीका. या संपूर्ण प्रचारादरम्यान राज ठाकरेंनी पहिल्यांदाच शिवसेनेवर निशाणा साधला.

‘त्यांना मत म्हणजे भाजपला मत’

एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी आज मात्र त्यांच्यासोबतच शिवसेनेवरही तोफ डागली. ‘शिवसेनेला मत दिलं तर ते मत भाजपला आणि नरेंद्र मोदींना जाईल. त्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच तुम्ही शिवसेनेला मत नाही दिलं पाहिजे’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

‘पवारांच्या बंगल्यावर कोण जातं ते सांगा एकदा’

यावेळी राज ठाकरेंनी ‘बारामतीचा पोपट’ या टिकेचा समाचार घेतला. ‘शरद पवारांचाच विषय असेल, तर शरद पवारांच्या दिल्लीतल्या बंगल्यावर कोणत्या पक्षाचे कोणते नेते जातात, हे एकदा यांनी सांगावं’, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच, यावेळी राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकांपूर्वी कशा प्रकारे शरद पवारांवर टीका करत होते आणि निवडणुकांनंतर कशा प्रकारे त्याच शरद पवारांवर स्तुतीसुमनं उधळत होते, याचा व्हिडिओ दाखवला. ‘जे स्वत: शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो असं म्हणतात, त्यांनी माझ्याविषयी काय बोलावं?’ असा सवाल देखील राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

‘भाजप सरकार काँग्रेसपेक्षा नालायक निघालं’

‘मी काँग्रेसवर टीका केलेल्या क्लिप्स बाहेर काढतायत म्हणे. मी केलीच होती टीका. ते मी नाकारतच नाही. पण ते नालायक होते असं सांगितलं म्हणून तुम्हाला आणलं. पण तुम्ही त्याहून जास्त नालायक निघालात’, असं म्हणत राज ठाकरेंनी भाजप सरकारवर तोफ डागली. ‘तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत होते, त्यांचे वाभाडे काढले, आता तुम्ही सत्तेत आहात, आता तुमचे वाभाडे काढीन. तोंडाला येईल ते बोलायला लागला आहात. माझ्या प्रश्नांची उत्तरं मला द्या’, असं ते म्हणाले. यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. ‘मुख्यमंत्री भांबावलेत, त्यामुळे त्यांना समजत नाहीये काय उत्तर द्यायचं. त्यासाठीच भाषणात २ दिवसांचा ब्रेक घेतला. म्हटलं २ दिवस तरी मुख्यमंत्री शांतपणे झोपतील’, असं राज ठाकरे म्हणाले.


हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का? – राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो..’ नंतर हरिसाल गाव उपसरपंचाचा व्हिडिओ!

‘मुकेश अंबानींचा मिलिंद देवरांना पाठिंबा हा संदेशच!’

मुकेश अंबानी हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जिवलग मित्र आहेत. देशातले सर्वात पॉवरफुल व्यवसायिक जर मिलिंद देवरांना पाठिंबा देत असतील, तर तो देशाला संदेश असतो की भाजपचं सरकार जाणार आहे. आजपर्यंत कोणत्याही उद्योगपतीनं कुठल्या राजकीय पक्षाला पाठिंबा दिल्याचं जाहीर केलेलं नाही. यावेळी राज ठाकरेंनी मोदींच्या एका जाहिरातीतला फोटो घेतलेल्या कुटुंबालाच स्टेजवर बोलावलं. मोदींच्या एका जाहिरातीत या कुटंबाचा स्वत:चा घरातला फोटो त्यांच्याही नकळत उचलून लावला आणि सोशल मीडियावर पसरवायला सुरुवात केली, असा दावा यावेळी राज ठाकरेंनी केला.

राफेल करारावरही केली टीका

या विमान करारात अनिल अंबानीचा काय संबंध? अनिल अंबानीनं आजपर्यंत कधी विमान बनवलंय का? आपल्याकडची सरकारी कंपनी एचएएल(HAL)ला डावलून अंबानीला हे कॉन्ट्रॅक्ट देतात, त्यावर आम्ही प्रश्न विचारणारच!

‘पुलवामा हल्ल्याआधी सतर्कतेचा इशारा दिला होता’

दरम्यान, पुलवामा हल्ल्यासंदर्भात यावेळी राज ठाकरेंनी मोदींवर तोफ डागली. ‘मी मागेच बोललो होतो की मोदी निवडणुकांच्या तोंडावर युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. ती निर्माण केली गेली. गुप्तहेर खात्याकडून त्यांना सांगितलं गेलं होतं की ज्या रस्त्यानं ते जवान जाणार आहेत, तिथे सगळी तपासणी करा. पण ते झालं नाही. या सीआरपीएफच्या जवानांना एअरलिफ्ट करा, विमानातून घेऊन जा असंही सांगितलं गेलं होतं. पण ते झालं नाही’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. ‘ज्या पद्धतीने पुलवामा हल्ल्यानंतर पुढचे काही दिवस मोदींनी वेगवेगळे कपडे घातले, त्यावरून ते फकीर नाही, बेफिकीर आहेत हेच दिसतंय’, असा टोलाही राज ठाकरेंनी यावेळी लगावला.

इथे पाहा संपूर्ण भाषण!

#Live : मुंबईत राज ठाकरेंची जाहीर सभा, मुंबईकरांना कोणते व्हिडिओ दाखवणार?

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 23, 2019

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here