घरताज्या घडामोडीशरद पवारांचं कोणतंही विधान निरर्थक नसतं - संजय राऊत

शरद पवारांचं कोणतंही विधान निरर्थक नसतं – संजय राऊत

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू पार्थ पवार यांच्या भूमिकेवर मत व्यक्त करताना ‘पार्थच्या मताला आम्ही काडीचीही किंमत देत नाही. तो अपरिपक्व आहे’, असं म्हटलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला असताना त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भूमिका व्यक्त केली आहे. ‘शरद पवारांना ओळखणं कठीण आहे. पण त्यांचं कोणतंही विधान निरर्थक नसतं. ते भारतीय राजकारणातले ज्येष्ठ नेते आहेत. पण पार्थ पवार यांच्या वक्तव्यावर त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने मत व्यक्त केलं आहे. त्यावर मी काहीही बोलू शकणार नाही. हा त्यांच्या कुटुंबातला, घरातला अंतर्गत मुद्दा आहे’, असं संजय राऊत म्हणाले. तसेच, ‘अजित पवार नाराज नाहीत, माध्यमांमध्ये सांगितली जाणारी माहिती चुकीची आहे. शरद पवारांसाठी आता तो मुद्दा संपलेला आहे. माध्यमांनी पवारांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढलाय. त्यांनी सीबीआयला आमंत्रण दिलेलं नाही. मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर जर वाटलं की त्यात काही राहिलं आहे, तर जगात कुणालाही त्याचा तपास करू द्या’, असं देखील राऊत यावेळी म्हणाले.

‘तपासात लपवण्यासारखं काहीही नाही’

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या CBI चौकशीवरून सध्या सुरू असलेल्या वादावर देखील त्यांनी आपलं मत मांडलं. ‘मुंबई पोलिसांचा तपास व्यवस्थित सुरू असताना सीबीआयला मध्ये घालणं चुकीचं आहे. आमचा त्याला विरोध नाही. तुम्ही सीआयए, केजीबी किंवा मोसादकडूनही तपास करा. इथे लपवण्यासारखं काहीही नाही. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाच्या पुढे सीबीआयला शोधण्यासारखं काही असेल असं मला वाटत नाही’, असं ते म्हणाले. तसेच, ‘तांत्रिकदृष्ट्या तपास सीबीआयकडे गेला आहे. पण हा महाराष्ट्राच्या अधिकारांवर अतिक्रमण आहे. लॉ अँड ऑर्डर हा विषय राज्यांचा आहे. अनन्यसाधारण परिस्थितीत राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी केंद्र सरकार मिलीट्री वगैरे बोलावण्यासारखे उपाय करू शकते. पण सध्या महाराष्ट्रात अशी कोणतीही परिस्थिती नाही’, असं देखील राऊतांनी सांगितलं.

- Advertisement -

‘आदित्य ठाकरेंचं नाव फक्त मीडिया घेतंय’

दरम्यान, सुशांत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव येत असल्यावर संजय राऊतांनी तीव्र आक्षेप घेतला. ‘आदित्य ठाकरे यांचं ना कुठेही आलेलं नाही. ते फक्त मीडिया घेत आहे. मोठ्या लोकांची नावं घेतल्याशिवाय त्या प्रकरणाला सनसनाटी मिळत नाही हे अलिकडच्या काळात सूत्र झालेलं आहे. मुंबई पोलीस जो तपास करत आहेत, त्यांना शांतपणे तो तपास करू द्यायला हवा. सुशांतला खरंच न्याय मिळायला हवा असेल, तर त्याच्या कुटुंबीयांसहित सर्वांनी थोडा वेळ शांत राहायला हवं’, असं ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -