घरमुंबईभाजपची गंगा आणि आमची चंद्रभागा

भाजपची गंगा आणि आमची चंद्रभागा

Subscribe

‘पहले मंदिर फिर सरकार’ हे सूत्र घेऊन अयोध्येतून सुरू झालेला राम मंदिराचा नारा शिवसेना सोमवारी पंढरपुरात देणार आहे. यानिमित्त आजवर भाजपने गंगा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली होती. शिवसेना आता चंद्रभागा स्वच्छ करण्याचा संकल्प सोडणार आहे. या सभेतूनच शिवसेनेकडून आगामी निवडणुकीचा बिगूल वाजवला जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या या दौर्‍यात सेनेच्या आजवर झालेल्या सभांचा उच्चांक मोडला जाणार आहेच, पण अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्याही सभांना उद्धव यांची ही सभा मागे टाकेल, अशी तयारी शिवसेनेने केली आहे. ज्या ठिकाणी उद्धव यांची ही सभा होणार आहे, त्या ठिकाणी आजवर दोनच सभा यशस्वीरित्या पार पडल्या. त्यात पहिली सभा होती ती तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची २००४ मध्ये पार पडलेली. नरेंद्र मोदी यांच्या २०१४ मध्ये पार पडलेल्या सभेहून उध्दव ठाकरेंची सभा मोठी करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे.

उध्दव ठाकरे यांच्या अयोध्येच्या सभेपासून देण्यात आलेल्या राम मंदिराचा नारा चंद्रभागेच्या तिरीही देण्यात येणार आहे. या सभेच्या तयारीसाठी शिवसेनेचे अर्धा डझन दिग्गज नेते गेल्या आठ दिवसांपासून पंढरपूरमध्ये ठाण मांडून आहेत. यात सेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यासह ज्येष्ठ मंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, दिवाकर रावते मंत्र्यांबरोबरच मुंबईतील ज्येष्ठ शिवसैनिकही तयारीच्या निमित्ताने पंढरपुरात ठाण मांडून होते. या सभेसाठी आवश्यक त्या परवानग्यांसह इतर तयारीही या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. उध्दव यांच्या या दौर्‍यात होणार्‍या सभेसाठी कॉलेज रोडवरील चंद्रभागा बस स्थानकाचे मैदान निश्चित करण्यात आले आहे. आषाढी एकादशीनिमित्त देशभरातून येणार्‍या वाहनांची पार्किंग या मैदानावर केली जाते. सुमारे पाच लाख लोक या ठिकाणी जमा होऊ शकतील, इतके हे प्रशस्त मैदान असल्याने आजवर या मैदानात फारशा सभा यशस्वी होऊ शकल्या नाहीत. ही बाब लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीत सभा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रविवारपर्यंत प्रयत्न सुरू होते.

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुखांच्या या दौर्‍याद्वारे भाजपला पुन्हा आव्हानाचे अस्त्र उगारले जाणार आहे. गंगा नदीच्या पात्राचे शुध्दीकरण करण्याचा संकल्प भाजपने जाहीर केला होता. मात्र सरकारची चार वर्षे पूर्ण होऊनही गंगेचे पात्र स्वच्छ होऊ शकले नाही. या प्रकरणी सेनेने भाजपवर टीकाही केली होती. अयोध्येच्या भेटीतही उध्दव ठाकरे यांनी याचा जाब भाजपला विचारला. गंगा स्वच्छ करण्याच्या भाजपच्या या संकल्पाला आव्हान देण्यासाठी शिवसेनेने राज्यातल्या सर्वात मोठ्या चंद्रभागेच्या पात्राच्या शुध्दीकरणाची मोहीम हाती घेण्याचा संकल्प सोडला आहे. यासाठी राज्याचे पर्यावरण खाते सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. राज्याचे पर्यावरण खाते हे रामदास कदम यांच्याकडे असल्याने खात्याकडून भरीव निधी देण्याची घोषणा त्यांनी याआधीच केली आहे. भाजपवर कुरघोडी करण्यासाठी सेनेने चंद्रभागेच्या स्वच्छतेचा मुद्दा घेतल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

या सभेतून येणार्‍या निवडणुकीचे बिगूल वाजवले जाईल, असे सांगितले जाते. स्वबळावर निवडणुका लढण्याच्या सेनेच्या या आधीच्या भूमिकेशी सुसंगत अशी तयारी या सभेतून सेनेकडून केली जात असल्याचे दिसते आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीतील पाडावानंतर भाजप युतीसाठी कासावीस झाला आहे. केंद्रातले नेते तर यासाठी घायकुतीला आले आहेत. मात्र सेनेने अजूनही त्यांना दाद दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर भाजपबरोबर जायच्या आधीच आपल्या ताकदीचा अंदाज दाखवून देऊन शिवसेना स्वत:ची ताकद भाजपला दाखवू इच्छित असल्याचे स्पष्ट झाले आहे. सेनेच्या वतीने करण्यात आलेली तयारी लक्षात घेता सेनेने ही सभा यशस्वी करण्यासाठी सारी ताकद पणाला लावली असल्याचे स्पष्ट दिसते. हजोरोंच्या संख्येने सेनेचे झेंडे, सुमारे २५० कमानी आणि हजारोंच्या संख्येने लावण्यात आलेल्या बॅनरद्वारे सेनेने आपल्या ताकदीचा अंदाज करून दिला आहे. या घडीला पंढरपूर नगरी भगवामय झाल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

चंद्रभागेवरील तिसरी सभा
शिवसेनेने आयोजलेली उध्दव ठाकरे यांची ही सभा यशस्वी व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे त्या कॉलेजरोडवरील मैदान हे आषाढी एकादशीनिमित्त देशभरातून येणार्‍या वाहनांच्या पार्किंगचे सर्वात मोठे मैदान मानले जाते. या मैदानात केवळ दोनच सभा यशस्वी होऊ शकल्या होत्या. त्यातील पहिली सभा ही तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत २००४ मध्ये शिवाजीराव शेंडगे यांच्या भाजप प्रवेशाची सभा होती. अटलजींच्या या सभेवेळी हे मैदान भरले होते. दुसरी सभा २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होय. या सभेवेळीही हे मैदान भरले होते. याशिवाय एकही सभा या मैदानावर यशस्वी होऊ शकली नव्हती. उध्दव ठाकरेंच्या सभेला पाच लाखांची गर्दी जमवून हे मैदान भरवले जाणार आहे. याद्वारे राज्यातल्या ताकदीचा अंदाज शिवसेना आपल्या मित्र पक्षाला करून देणार आहे.

आमची चंद्रभागा
भाजपने गंगेच्या स्वच्छतेचा संकल्प सोडला होता. मात्र सत्तेची चार वर्षे पूर्ण होऊनही हा संकल्प भाजपला पूर्ण करता आलेला नाही. आता शिवसेनेने चंद्रभागेच्या शुध्दीकरणाचा संकल्प सोडला आहे. यासाठी पर्यावरण मंत्रालयाकडून कालबध्द कार्यक्रमही हाती घेण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय केंद्रातील निधीसाठीही प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. चंद्रभागेचे पात्र स्वच्छ करतानाच प्रदूषण करणार्‍यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल.
– रामदास कदम, पर्यावरण मंत्री.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -