पालिकेत औषधांचा तुटवडा; दवाखाने-हॉस्पिटल्समधील मधुमेही रुग्णांचे हाल

मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून लोकप्रतिनिधींकडून बोंब ठोकली जात असतानाच आता मागील १५ दिवसांपासून मधुमेही रुग्णांसाठी असलेल्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Mumbai
औषधांचा तुटवडा

मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून लोकप्रतिनिधींकडून बोंब ठोकली जात असतानाच आता मागील १५ दिवसांपासून मधुमेही रुग्णांसाठी असलेल्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. महापालिकेच्या दवाखान्यांसह हॉस्पिटल्समध्ये मधुमेही रुग्णांसाठी औषधे नसल्याने गरीब, ज्येष्ठ नागरिक रुग्णांना खिशातील पैसे खर्च करत बाहेरुन औषधे खरेदी करावी लागत आहेत.

मुंबईतील महापालिकेच्या प्रमुख हॉस्पिटल्ससह उपनगरीय रुग्णालये, दवाखाने आणि प्रसुतीगृहांमध्ये मागील महिन्यांपासून औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णांना बाहेरील औषधे आणण्यासाठी डॉक्टरांकडून चिठ्ठ्या दिल्या जात होत्या. याबाबत विरेाधी पक्षनेते रवी राजा, सपाचे गटनेते रईस शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी हॉस्पिटल्समधील औषधांच्या असुविधेबाबत विशेष बैठकीचे आयोजन करण्याची मागणी स्थायी समिती अध्यक्ष तसेच महापौरांकडे केली होती. मात्र, औषधांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्यानंतर प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली. तसेच औषध खरेदीचे विक्रेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यातही आला. त्यामुळे यापूर्वी सर्व हॉस्पिटल्ससाठी शेड्युल्ड १२ ची औषधे एकत्रपणे खरेदी केली जातात. त्याऐवजी प्रत्येक हॉस्पिटल्सचे अधिष्ठाता आणि अधिक्षक आपापल्या हॉस्पिटल्सच्या गरजेप्रमाणे औषधे खरेदी करतील. जेणेकरून हॉस्पिटल्समधील औषधांचा कधीही तुटवडा भासणार नाही. परंतु आयुक्तांनी तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी औषध खरेदीसाठी सुचना केल्यानंतरही कोणत्याही प्रकारच्या सुधारणा दिसून येत नाही.

बदलत्या जीवनशैलीनुसार व्यक्तींना मधुमेह आणि रक्तदाब आदींचे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे या बदलत्या जीवनशैलीनुसार रुग्णांना होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने मधुमेहासह रक्तदाबाच्या आजारांचे निदान तसेच उपचार हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध करून दिले आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना निराश होऊन परतावे लागत आहे. रुग्णांना यासाठीची औषधेच दवाखान्यांमध्ये उपलब्ध नसून मुंबईतील सर्वच हॉस्पिटल्स, दवाखान्यांमध्ये मधुमेहावरील उपचाराची औषधे उपलब्ध नसल्याची माहिती मिळत आहे.

समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नागपाड्यातील हकीम अजमल खान दवाखान्यात आपण नेहमीप्रमाणे पाहणी करण्यास गेलो असता, तिथे मागील १५ दिवसांपासून मधुमेहावरील औषधेच नसल्याची माहिती तेथील रुग्णांनी व डॉक्टरांनी दिली. यासंदर्भात आपण कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी संपूर्ण मुंबईतच ही औषधे नसल्याचे सांगितले. या औषधांअभावी ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये सर्व प्रकारच्या इंजेक्शनचा साठाही तुरळक असून येत्या महिनाभर पुरेल इतकाच साठा आहे. त्यामुळे इंजेक्शनअभावी रुग्णांचे मोठे हाल होणार असून प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा –

कर्जमाफी नको, कर्जमुक्ती हवी; उद्धव ठाकरे यांचा लासूरमध्ये पुनरुच्चार

‘कंडोम’कंपन्यांकडून सरकारची फसवणूक