घरमुंबईनिकालात इंग्रजी शाळांची सरशी,मराठी माध्यमाची पिछेहाट

निकालात इंग्रजी शाळांची सरशी,मराठी माध्यमाची पिछेहाट

Subscribe

मराठी ७८.४२ टक्के तर इंग्रजीने गाठली नव्वदी

मुंबईसह राज्यातील पालकांवर सध्या इंग्रजी माध्यमाचा वाढत असलेला कल यंदा दहावीच्या निकालात दिसून आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मराठी माध्यमाचा शाळांचा निकाल १२.५४ टक्क्यांनी कमी लागला आहे. यंदा ७८.४२ टक्के इतका लागला आहे. तर दुसरीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा निकाल ९०.९९ टक्के लागला आहे. मराठी शाळांप्रमाणे इंग्रजी माध्यमाचा शाळांचा निकालाचा टक्का घसरला असला तरी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी नव्वदी गाठल्याने पालक शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. गेल्यावर्षी इंग्रजी माध्यमाचा निकाल ९७ टक्के इतका लागला होता.

राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या यंदाच्या एसएससी बोर्डाच्या परीक्षेला मराठी माध्यमातील एकूण ११ लाख ९३ हजार ५९१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ७८.४२ म्हणजेच ९ लाख ३५ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. तर दुसरीकडे इंग्रजी माध्यमातील २ लाख ८२ हजार ११८ विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली होती. त्यापैकी एकूण २ लाख ५६ हजार २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे हे प्रमाण ९०.९९ टक्के इतके आहे. मुंबई विभागीय निकालावर नजर टाकली असता यंदा मुंबई विभागातून मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची पिछेहाट झाल्याचे दिसून आले आहे. यंदा मुंबईतून एकूण १ लाख ३० हजार ८५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ९९ हजार ६५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा मुंबईत मराठी माध्यमाचा शाळांचा निकाल ७६.१६ टक्के लागला आहे. तर इंग्रजी माध्यमांच्या निकालाबाबत म्हणायचे झाले तर मुंबई विभागात इंग्रजी माध्यमांचा निकाल यंदा ८८.३५ टक्के इतका लागला आहे. यंदा मुंबईतील एकूण १ लाख ६७ हजार २१० विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ४७ हजार ७३८ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असल्याचे दिसून आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, मराठी माध्यमातून एसएससी बोर्डाची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. यंदा राज्याच्या नऊ विभागीय मंडळातून मराठी माध्यमातील १२ लाख ०९ हजार २०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा १२ लाख ७१ हजारांच्या घरात होता. तर इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थ्यांची संख्या दिवसागणित वाढत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्यावर्षी २ लाख ६२ हजार इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदा हा आकडा २ लाख ८२ हजारांवर पोहचला आहे. मुंबईतही साधारण असेच चित्र दिसून आले असून मुंबईत यंदा १ लाख ६७ हजार २१० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा वाढल्याचे दिसून आले आहे. गेल्यावर्षी इंग्रजी माध्यमाचा निकाल ८ टक्क्यांनी वाढला होता. यंदा मात्र तो कमी झाला असला तरी तो समाधानकारक असल्याचे शिक्षणतज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -