एसटीचा १० हजार ४६७ कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

नवीन २ हजार बसेसची खरेदी करणार

Maharashtra State Road Transport Corporation

राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाचा वर्ष २०२०-२१ चा १० हजार ४६७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एसटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे.त्यानुसार २०२०-२१मध्ये एसटी महामंडळ तब्बल २ हजार नवीन बसेस खरेदी करणार आहे.

राज्याच्या कानाकोपर्‍यातील नागरिकांचे एसटी हे प्रवासाचे प्रमुख साधन आहे. एसटीने दररोज सुमारे ६५ लाख प्रवासी प्रवास करतात. २०२०-२१मध्ये ज्या नवीन २ हजार बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात यावी, अशी मागणी परिवहन मंत्र्यांनी केलेली आहे. महामंडळाच्या ताफ्यातील १३४२ जुन्या बसेसची माईल्ड स्टीलमध्ये पुनर्बांधणी करण्याकरिता १७४ कोटी ४६ लाख तर ६०० साध्या जुन्या बसेसच्या चॅसिसला माईल्ड स्टीलमध्ये बांधणी करण्याकरिता ७१ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद एसटीच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.याचबरोबर २०१९-२० या वर्षात ७०० नवीन बसेस खरेदी करण्याकरिता राज्य शासनाने ११० कोटी रुपयांचा निधी दिला होता.

अर्थसंकल्पात राज्य शासनाकडून भांडवली अंशदान म्हणून ५९७ कोटी ९०लाख रुपये आणि बसस्थानकाचे आधुनिकीकरण-दर्जा वाढविण्यासाठी १३४ कोटी ८९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न ७४६२ कोटी ९० लाख,विविध सवलतीच्या मूल्याची प्रतीपूर्ती १८९४ कोटी २० लाख आणि इतर माध्यमातून मिळणारे ३०८ कोटी ४ लाख रुपये असे एकूण ९६६५ कोटी १४ लाखांचे उत्पन्न महामंडळाला अपेक्षित आहे. कर्मचारी वेतनावरील खर्च ४३८३ कोटी ९० लाख,इंधनाकरिता ३३८५ कोटी ४० लाख,प्रवासी कर-मोटार वाहन कर ११५२ कोटी ४८ लाख,टोल टॅक्स १५४ कोटी १७ लाख व इतर खर्च असा एकूण खर्च १०, ४६७ कोटी १७ लाख अपेक्षित आहे. महामंडळाला मिळणार्‍या उत्पन्नातून खर्च वजा केला असता ८०२ कोटी ३ लाखांची तूट होते आहे.