शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

मोबाईल एक आणि मुले जास्त, शैक्षणिक साधने उपलब्ध नसणे अशा अनेक समस्या घराघरांमध्ये निर्माण झाल्या आहेत. स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करून देण्याची शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांची मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र मोबाईल एक आणि मुले जास्त, शैक्षणिक साधने उपलब्ध नसणे अशा अनेक समस्या घराघरांमध्ये निर्माण झाल्या आहेत. परिणामी अनेक ठिकाणी तणाव निर्माण होऊन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना पुढे येत आहेत. हे वास्तव लक्षात घेऊन मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने ऑफलाईन शिक्षण सुरू करण्याची मागणी शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे.

देशातील विविध राज्यातील आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती कुलकर्णी यांनी संकलित केली आहे. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम, पंजाब, गुजरात, कर्नाटकमध्ये शैक्षणिक साहित्य नसल्याने १० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तामिळनाडूतील एकाच कुटुंबात तीन मुलींमध्ये एकच मोबाइल होता. त्यातून निर्माण झालेल्या तणावातून एका मुलीने आत्महत्या केली. म्हैसूरजवळ एका मुलीच्या आई वडिलांचे काम सुटले त्यामुळे पैसे नसल्याने मोबाईल घेऊ शकत नसल्याने त्या मुलीने आत्महत्या केली. राज्यातील सांगली आणि सातारा जिल्ह्यात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्या केलेले विद्यार्थी नववी ते बारावीचे असून बहुतेकांचे पालक शेतकरी, शेतमजूर व कोरोनामध्ये बेरोजगार झालेले आहेत. घरखर्च चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असताना मोबाईलचा खर्च परवडत नाही. त्यामुळे ते मुलांना ऑनलाइन शिक्षण देऊ शकते नाहीत, असे निरीक्षणही कुलकर्णी यांनी नोंदविले आहे.

आत्महत्या रोखण्यासाठी काय करावे

ज्या मुलांकडे मोबाईल नाही त्यांच्यासाठी सरकारने स्वाध्याय पुस्तिका छापून वितरित करणे, रेडिओ टीव्हीवरील शिक्षणाचा वेळ वाढवावा, अनेक शिक्षक व संस्था ५ ते १० विद्यार्थ्यांना घेऊन शिकवत आहेत. यावर भर द्यायला हवा, मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांची शिक्षकांनी भेट घेऊन त्यांच्या अभ्यासाची चौकशी करणे, समुपदेशन करणे, पालकांशी बोलणे असे पर्याय हेरंब कुलकर्णी यांनी सुचवले.

मोबाईल अभावी शाळा सोडण्याचे प्रमाण वाढेल

मोबाइल नसलेल्या मुलांमध्ये न्युनगंड निर्माण होऊन शाळा सोडण्याचे प्रमाण वाढेल. शाळा सुरू झाल्यावर ऑनलाइन शिक्षण घेतलेले आणि न घेतलेले असे दोन प्रकारचे विद्यार्थी असतील. या विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करणे हे नवेच आव्हान शाळांपुढे निर्माण होईल या गरीब मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ नये म्हणून विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.