ठाण्यात तब्बल 4 हजार 507 इमारती धोकादायक

राज्य सरकारची माहिती

Mumbai
Thane Municipal Corporation
ठाणे महापालिका

ठाण्यातील तब्बल 4 हजार 507 इमारती धोकादायक स्थितीत असल्याची माहिती राज्य सरकारने २५ जून रोजी विधानसभेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती देण्यात आली. या धोकादायक इमारतींमध्ये राहणार्‍या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी ठाणे महानगरपालिकेने 2 हजार 570 गाळे भाडेतत्त्वावर घेतले आहेत. साडेचार हजार धोकादायक इमारतींमध्ये 103 इमारती अतिधोकादायक स्थितीत आहेत. तर 98 इमारती रिकाम्या करुन त्याची दुरुस्ती करावी लागणार असल्याची माहिती, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी दिली.

तसेच ठाणे येथील धोकादायक इमारतींसंदर्भात तज्ज्ञांकडून अहवाल मागविण्यात आले आहेत. मुंबईमध्ये धोकादायक इमारतींसाठी तांत्रिक सल्लागार समिती आहे. त्याप्रमाणे ठाणे येथेही सल्लागार समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात येतील असेही सागर यांनी सांगितले.

ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील धोकादायक इमारतीस स्ट्रक्चरल ऑडीटनुसार रहिवास परवानगीसह दुरुस्तीस परवानगी देण्यात आली आहे. गांधीनगर येथील तळ एक इमारतीचा काही भाग कोसळल्याने या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना ठाणे महानगरपालिकेने दिल्या आहेत. तसेच, सी वन प्रवर्गातील 103 इमारतींपैकी 82 इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत. यापैकी 8 इमारती तोडण्यात आल्या आहेत. धोकादायक इमारतींचा विकास मालक करत नसेल तर त्याबाबत भाडोत्रींना तसे करण्याचा अधिकार देण्यात आले आहेत. ज्या इमारती निष्कासित करावयाच्या आहेत. त्यातील रहिवाशांना राहण्यासाठी गाळे देण्यात आले आहेत. अशी माहितीही सागर यांनी दिली. यावेळी आमदार संजय केळकर, शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.