घरमुंबईवयोवृद्ध महिलेच्या हत्येतील आरोपी तेरा वर्षांनी जेरबंद

वयोवृद्ध महिलेच्या हत्येतील आरोपी तेरा वर्षांनी जेरबंद

Subscribe

गावदेवी येथे रॉबरीच्या उद्देशाने एका वयोवृद्ध महिलेची हत्या केल्याच्या आरोप असलेल्या एका वॉण्टेड आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. राजेशकुमार कुंजबिहारी द्विवेदी असे या 37 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्याला कारागृहात पाठविण्यात आले आहे. पेरॉलवर सुटताच राजेशकुमार हा तेरा वर्षांपासून मध्यप्रदेशात वास्तव्यास होता. अखेर त्याला तेरा वर्षांनी पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 17 मार्च 2003 रोजी गावदेवी येथील तिरुपती अपार्टमेंटच्या आशिष इमारतीमध्ये एका वयोवृद्ध महिलेची हत्या झाली होती. हत्येनंतर मारेकर्‍याने त्यांच्या घरातील सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी हत्येसह रॉबरीचा गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला होता.

ही शोधमोहीम सुरू असतानाच तिथे सुरक्षारक्षक म्हणून कामाला असलेल्या राजेशकुमार द्विवेदी याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याविरुद्ध नंतर विशेष सेशन कोर्टात खटला चालविण्यात आला होता. या खटल्यात त्याला कोर्टाने 2007 साली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर त्याला नाशिक कारगृहात पाठविण्यात आले होते. शिक्षा भोगत असताना त्याने या शिक्षेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर करताना पत्नीचे आजारपणाचे कारण पुढे करुन पेरॉलवर सोडण्याची विनंती केली होती. ऑक्टोबर 2015 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्या जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती. त्यापूर्वी त्याला कोर्टाने एक महिन्यांच्या पेरॉलवर सोडले होते. जुलै 2007 रोजी त्याला पुन्हा कारागृहात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र तो पेरॉलवर सुटताच पळून गेला होता. गेल्या तेरा वर्षांपासून तो वॉण्टेड होता. त्याच्या अटकेसाठी कोर्टाने अटकपूर्व जामीन वॉरंट जारी केले होते.

- Advertisement -

राजेशकुमार हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवाशी होता. त्यामुळे त्याच्या गावी पोलीस गेले होते. मात्र आई-पत्नीला भेटल्यानंतर तो पळून गेला होता. त्याचा शोध सुरु असतानाच तो मध्य प्रदेशातील सिंगरोली, विंध्यनगर परिसरात राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून तेरा वर्षांनी राजेशकुमार द्विवेदीला शिताफीने अटक केली. त्याला ट्रॉन्झिंट रिमांडवर नंतर मुंबईत आणण्यात आले होते. बुधवारी त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -