डोंबिवलीत ट्रकने दुचाकीला धडक दिली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Dombivli

डोंबिवलीतील खांबाळपाडा परिसरात ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक दाम्पत्य आणि त्यांच्या लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. गणेश चौधरी, उर्मिला चौधरी आणि चार वर्षीय हंसिका चौधरी अशी मृतांची नावं आहेत. तर त्यांचा पाच वर्षांचा मुलगा देवांश या अपघातात जखमी झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अशी घडली घटना

सकाळी ७ वाजता गणेश चौधरी हे आपली पत्नी उर्मिला, चार वर्षांची मुलगी हंसिका आणि पाच वर्षांचा मुलगा देवांश यांच्यासह सकाळी आपल्या दुचाकीने कल्याणहून डोंबिवलीकडे निघाले होते. कल्याण शीळ रस्त्यावरुन टाटा पॉवरकडे वळण घेत असताना खांबाळपाडा भागात एका गेटमधून ट्रक वेगाने बाहेर पडला. ट्रकला साईड देण्याच्या प्रयत्नात चौधरींच्या दुचाकीचं हँडल ट्रकच्या चाकाला घासलं. त्यामुळे दुचाकीचा तोल जाऊन गणेश, उर्मिला आणि दुचाकीवर पुढे उभी असलेली हंसिका ट्रकच्या मागच्या चाकाखाली फेकले गेले. ट्रकचं चाक अंगावरुन गेल्यामुळे अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. आई-वडिलांच्या मध्ये बसलेला देवांश दुसऱ्या बाजूला फेकला गेल्यामुळे त्याला किरकोळ दुखापत झाली. त्याच्यावर डोंबिवलीतील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – पुण्यात बंद फ्लॅटमध्ये आढळला ३० वर्षीय तरुणीचा मृतदेह