घरमुंबईमहिला जवान घडविण्यासाठी ‘उडान’

महिला जवान घडविण्यासाठी ‘उडान’

Subscribe

स्कॉड्रन लिडर सुप्रिया चित्रेंचा पुढाकार

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारतीय हवाई दलाची ताकद सार्‍या जगासमोर आली. भारतीय हवाई दलाने अनेकदा आपले सामर्थ्य जगाला दाखवले आहे. सैन्य दलातील महत्त्वाच्या हवाई दलामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक महिलाही काम करतात. हवाई दलातून निवृत्त झालेल्या स्कॉड्रन लिडर सुप्रिया चित्रे यांनी ‘उडान फाऊंडेशन’च्या माध्यमातून देशाच्या रक्षणासाठी महिला जवान घडवण्याचे काम हाती घेतले आहे.

हवाई दलात स्कॉड्रन लिडर सुप्रिया चित्रे 2016 मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्या नाशिकमध्ये स्थायिक झाल्या. नाशिकमध्ये आल्यानंतर मुलींना सैन्यात भरतीसाठी आवश्यक मार्गदर्शन करणारी संस्था नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोणती परीक्षा द्यावी, कशाप्रकारे शारीरिक व मानसिक तयारी करावी याचे कोणतेही ज्ञान मुलींना मिळत नव्हते. त्यामुळे मुलींना संरक्षणविषयक ज्ञान देण्यासाठी दर्जेदार व शाश्वत संस्था असावी यासाठी चित्रे यांनी नाशिकमध्ये ‘उडान’ फाऊंडेशनची स्थापना केली

- Advertisement -

यामध्ये आर्थिकदृष्ट्या संरक्षणविषयक कोचिंग न परवडणार्‍या मुलींना मोफत मार्गदर्शन करण्यात येते. विविध कॅम्प घेऊन मुलींना संरक्षम क्षेत्रातील करियरची झलक दाखवण्यात येते. कॅम्पमध्ये मुलींना अधिकार्‍यांशी संवाद साधणे, सैन्यातील राहणीमान याची माहिती दिली जाते. यामध्ये 8 ते 22 वर्षांच्या मुलींवर लक्ष केंद्रित करण्यात येते. उडाणमध्ये कर्नल दर्जाच्या अधिकार्‍यांबरोबरच मानसोपचारतज्ज्ञांकडून मुलींना मार्गदर्शन केले जाते. भरती होण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती व मानसिकता महत्त्वाची असल्याने त्यांची कलचाचणी करून त्यांना मार्गदर्शन केले जाते.

मुलांना सैन्यात पाठवण्यास पालक तयार नसताना मुलींची गोष्टच दूर असते. त्यामुळे पालकांकडून मुली सैन्यात सुरक्षित असतील का? घरापासून लांब त्या राहू शकतील का? असे प्रश्न विचारले जातात. यावर सुप्रिया चित्रे स्वत:चे उदाहरण देऊन त्यांचा 10 वर्षांचा अनुभव पालकांसमोर मांडतात. सैन्य दलाइतके सुरक्षित क्षेत्र कोणतेच नसून, मुलींसाठी हे एक उत्तम क्षेत्र आहे. सैन्यातील लोकांमध्ये महिलांबाबत फारच आदरभाव असतो. सैन्यात महिला भरती झाल्यानंतर त्यांच्या व्यक्तीमत्त्वामध्ये बदल होतो. त्या हुशार, धाडसी, जिगरबाज, स्वतंत्र वृत्तीच्या, स्वावलंबी होतात. या बाबी चित्रे पालकांना पटवून देतात.

- Advertisement -

1992 मध्ये जेव्हा महिलांसाठी सैन्यदलाचे दार उघडले तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. सैन्यात महिला व पुरुष असा कोणताही भेदभाव केला जात नसल्याने आज हवाई दलामध्ये तीन महिला फायटर पायलट आहेत. त्यामुळे सैन्य दलातील सर्वच शाखा महिलांसाठी हळूहळू सुरू होतील, असा विश्वास सुप्रिया चित्रे यांनी व्यक्त केला.
भरतीसाठी योग्य मार्गदर्शनासह मेहनत घ्या

सैन्यात महिला व पुरुष असा कोणताही भेदभाव नसतो. त्यामुळे मार्गदर्शनासह व्यवस्थित तयारी करा. शॉर्टकट नसल्याने मेहनतीला पर्याय नाही. प्रशिक्षण, निवड प्रक्रिया सर्वांसाठी समान असते. सैन्यदलात आरक्षण दुय्यम असून कामगिरीवरच तुमची पत ठरते. त्यामुळे सैन्यदलात मेहनत महत्त्वाची आहे, असा सल्ला स्कॉड्रन लिडर (निवृत्त) सुप्रिया चित्रे यांनी सैन्यात भरती होऊ इच्छिणार्‍या मुलींना दिला.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -