पिझ्झाच्या बिलावरुन महिला चोर अटकेत

मूकबधीर महिलेने हजारो रुपये लुटले

Mumbai
NBFCS

सायन हॉस्पिटलमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करणार्‍या महिलेची पर्स दोन दिवसांपूर्वी जीटीबी रेल्वे स्टेशन परिसरातून चोरीला गेली. पर्समध्ये असणार्‍या एटीएमच्या मदतीने चोराने पैसेही काढले. मात्र पिझ्झाच्या बिलावरुन कुर्ला रेल्वे पोलिसांनी या चोर महिलेच्या मुसक्या आवळल्या. आरोपी महिला चोर ही मूकबधीर आहे.

सायन हॉस्पिटलात लॅब असिस्टंट म्हणून काम करणार्‍या सिंधू माने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या भांडूपमधल्या घरी जाण्यास निघाल्या होत्या. महिला डब्यातून प्रवास करत असताना त्यांच्या बॅगेतून कोणीतरी पर्स चोरी केली. त्या घरी पोहोचल्या मात्र ही बाब त्यांच्या लक्षात आली नव्हती. रात्रीच्या सुमारास त्यांच्या फोनवर बँक खात्यातून पैसे काढल्याचे लक्षात आले. सुरुवातीला त्या गोंधळल्या, पण बॅग तपासली असता त्यातून एटीएम असलेली पर्स चोरी झाल्याचे त्यांना कळले. सुरुवातीला एटीएममधून ५ हजार रुपये त्यानंतर १० हजार रुपये आणि पुन्हा १५ हजार रुपये अशा प्रकारे तीन वेगवेगळ्या एटीएममधून चोराने पैसे काढले होते.

दुसर्‍या दिवशी तात्काळ त्यांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला. कुर्ला रेल्वे पोलिसांनी बँकेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला. दरम्यान, आरोपी महिलेने स्वत:साठी ऑनलाईन शॉपिंगदेखील केल्याचे मोबाईलवर आलेल्या मेसेजवरुन समजले होते. आरोपी नम्रता थोरात ही मुकबधीर असून तिने मुलुंडमध्ये असणार्‍या एका साडीच्या दुकानातून स्वत:साठी साडी आणि काही कपडे खरेदी केले तसेच तिथल्याच एका सोन्याच्या दुकानातून ९ हजार रुपये किंमतीची एक सोन्याची अंगठी देखील विकत घेतली आणि त्याचेही पैसे ऑनलाईन पद्धतीने दिले. यानंतर आरोपी महिलेने एका मोठ्या दुकानात जावून पिझ्झादेखील खाल्ला आणि इथेही बिल कार्ड स्वाईप करुन भरले.

पोलिसांना मिळालेल्या संदेशावरुन त्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्या महिलेला शोधण्यात यश आले. आरोपी नम्रता थोरात आणि तिचा पती दोघेही मुकबधीर आहेत. त्यामुळे झटपट पैसे कमवण्याचा नादात तिने चोरी करायला सुरुवात केली होती. कुर्ला रेल्वे पोलिसांनी तिच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करुन अटक केली. १५ जानेवारीपर्यंत तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here