Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर नवी मुंबई कोट्यवधींचा जेएनपीटी रस्ता खड्ड्यात

कोट्यवधींचा जेएनपीटी रस्ता खड्ड्यात

Related Story

- Advertisement -

कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेला जेएनपीटी मार्गावरील रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने कामाच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित करण्यात येत असून, निकृष्ट कामामुळेच रस्ता खचल्याचे जाणकारांचे मत आहे. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा रस्ता अचानक खचला आहे. त्यामुळे जेएनपीटीकडे जाणारी वाहतूक दुसर्‍या (सर्व्हिस) मार्गाने वळविण्यात आली आहे.

जेएनपीटी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कोट्यवधी रुपये खर्च करून चौथ्या बंदरासाठी रस्ते बांधण्यात आले आहेत. मात्र, सुमार दर्जामुळे हे रस्ते वारंवार खचत आहेत. जेएनपीटीचा विस्तार वाढत असल्याने सर्व रस्त्यांचे रुंदीकरण, मजबुतीकरण आणि काँक्रिटीकरण सुरू आहे. जेनपीटीकडून जवळ-जवळ 3 हजार कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निगराणीखाली ही सर्व कामे सुरू आहेत. यामध्ये अनेक उड्डाणपूल आणि छोटे-मोठे पूल आहेत. जेएनपीटी-पळस्पे मार्गावर (एनएच-348) पागोटे जंक्शनजवळ हा रस्ता खचला आहे.

- Advertisement -

चांगले पायलिंग न करता केवळ खाडीच्या दलदलीत रस्त्याचा भराव केल्यामुळे तो मधोमध खचला असून, त्यामुळे रस्त्याच्या बाजूने जाणार्‍या सर्व्हिस रस्त्याला देखील एक ते दीड किलोमीटरपर्यंत भेगा गेल्या आहेत. या रस्त्याच्या बाजूलाच असलेली खारफुटी आणि चिखल देखील दाबामुळे वरती आला आहे. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली तरी देखील धोकादायक सर्व्हिस रोडवरून बिनधोकपणे वाहतूक सुरू होती. उशिरा याबाबत वाहतूक पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वाहतूक बंद करून दुसर्‍या मार्गावरून वळवली. रस्ता खचल्यामुळे काम सुरू असलेल्या उड्डाणपुलालाही धोका निर्माण झाला आहे. या पुलाच्या जोड रस्त्यासाठी हा भराव सुरू होता. 100 ते 150 मीटरपर्यंत या भरावाची माती जमिनीत खचली आहे. दोन वर्षांपूर्वी प्राधिकरणाने बांधलेला सिंगापूर पोर्टचा रस्ता देखील मोठ्या प्रमाणात खचला होता.

रस्ता खचण्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, नेमके कशामुळे हे घडले हे आता सांगता येणे शक्य नाही. येत्या 15 दिवसांत रस्ता पूर्ववत करून वाहतूक सुरळीत होईल. तोपर्यंत पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली आहे.
– प्रशांत फेगडे, संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)

- Advertisement -

- Advertisement -