घरक्रीडाप्रज्ञेशला मुख्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश

प्रज्ञेशला मुख्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश

Subscribe

भारताचा आघाडीचा पुरुष टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनला ऑस्ट्रेलियन ओपन या वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. पात्रता फेरीच्या सुरुवातीच्या सामन्यांत चांगली कामगिरी करण्यार्‍या प्रज्ञेशला अखेरच्या सामन्यात लात्व्हियाच्या एरनेस्ट्स गुलबीसने पराभूत केले. जागतिक क्रमवारीत १२२ व्या स्थानी असणार्‍या प्रज्ञेशने हा सामना ६-७, २-६ असा गमावला.

प्रज्ञेशने याआधी पात्रता फेरीच्या पहिल्या दोन सामन्यांत ऑस्ट्रेलियाच्या हॅरी बौचर आणि जर्मनीच्या यानिक हांफमनवर मात केली होती. मात्र, पात्रता फेरीतील अखेरच्या सामन्यात त्याला आपला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. प्रज्ञेश आणि गुलबीस यांच्यातील सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी झाल्याने टाय-ब्रेकर खेळवण्यात आला. यात सुरुवातीला आघाडी घेतल्यानंतर प्रज्ञेशने चुका केल्या आणि याचा फायदा घेत गुलबीसने सेट जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये प्रज्ञेशचा खेळ अधिकच खालावला. गुलबीसने प्रज्ञेशच्या पहिल्या दोन सर्व्हिस मोडत ३-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर प्रज्ञेशला पुनरागमन करता आले नाही. त्यामुळे गुलबीसने दुसरा सेट ६-२ असा मोठ्या फरकाने जिंकत मुख्य फेरीत प्रवेश केला.

- Advertisement -

प्रज्ञेशच्या पराभवामुळे भारताचे एकेरीतील आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले. सुमित नागलला पात्रता फेरीच्या पहिल्याच सामन्यात इजिप्तच्या मोहम्मद साफवातने पराभूत केले होते. त्याचप्रमाणे रामकुमार रामनाथन आणि महिलांमध्ये अंकिता रैनाही प्राथमिक फेरीत स्पर्धेबाहेर झाले.

नदाल, जोकोविच मोडतील माझा विक्रम -रॉजर फेडरर

राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच यांच्यापैकी एक किंवा दोघेही माझा सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदांचा विक्रम मोडतील, असे विधान स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने केले. टेनिस इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळखल्या जाणार्‍या फेडररने २० ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तर नदालच्या नावे १९ आणि जोकोविचच्या नावे १६ ग्रँड स्लॅम जेतेपदे आहेत. नदाल आणि जोकोविच माझ्यापेक्षा जास्त ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकतील असे मला वाटते. ते दोघेही सध्या चांगला खेळ करत आहेत. त्यांनी मागील मोसमात ज्याप्रकारे खेळ केला, ते पाहता आगामी काळात त्यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा करता येईल, असे फेडरर म्हणाला. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये नदालने आपले सुरुवातीचे सामने जिंकल्यास उपांत्य फेरीत त्याचा सामना फेडरर किंवा जोकोविचशी होऊ शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -