घरक्रीडाबजरंग, विनेशची खेलरत्नसाठी शिफारस

बजरंग, विनेशची खेलरत्नसाठी शिफारस

Subscribe

राहुल आवारेची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

भारतीय आघाडीचे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांची भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाने केंद्र सरकारकडे ही शिफारस केली आहे.
बजरंग आणि विनेश या दोघांनी मागील काही वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर अप्रतिम कामगिरी केली आहे. नुकत्याच संपलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बजरंगने ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले होते. मागील वर्षी त्याने एशियाडमध्येही सुवर्ण कामगिरी केली होती. मागील वर्षी खेलरत्न पुरस्कार न मिळाल्याने नाराज झालेल्या बजरंगने केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांची भेट घेतली होती.

मात्र, त्याने यावर्षी पुन्हा अप्रतिम कामगिरी सुरू ठेवल्यामुळे त्याची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. विनेश फोगाटला आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र, मागील वर्षी तिनेही एशियाडमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली महिला भारतीय खेळाडू होती.

- Advertisement -

कुस्ती महासंघाने खेलरत्नप्रमाणेच अर्जुन पुरस्कारासाठीही काही खेळाडूंच्या नावाची शिफारस केली आहे. यामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण मिळवणारा मराठमोळा राहुल आवारे, हरप्रीत सिंग, दिव्या ककरन आणि पूजा ढांडा यांचा समावेश आहे. तसेच विरेंदर कुमार, सुजीत मान, नरेंद्र कुमार आणि विक्रम कुमार यांच्या नावाची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी, तर भीम सिंग आणि जय प्रकाश यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. आता येत्या सप्टेंबरमध्ये राज्यवर्धन राठोड हे खेळाडूंच्या कामगिरीची समीक्षा करणार आहेत. त्यानंतर निवड समितीला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी क्रीडा मंत्रालयाकडून शिफारस केली जाईल.

भारताचे नेमबाज हीना सिद्धू आणि अंकुर मित्तल यांची राष्ट्रीय नेमबाजी महासंघाने ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. तसेच अंजुम मुद्गिल (रायफल), शाहझार रिझवी (पिस्तूल) आणि ओम प्रकाश मिठारवाल यांच्या नावांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. हीना सिद्धू ही भारतातील सर्वोत्तम नेमबाजांपैकी एक म्हणून ओळखली जाते. तिने याआधी विश्वचषक, राष्ट्रकुल, एशियाड या सर्व स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -