घरIPL 2020IPL 2020 : CSKच्या बाबतीत 'हे' याआधी कधीही झाले नव्हते!

IPL 2020 : CSKच्या बाबतीत ‘हे’ याआधी कधीही झाले नव्हते!

Subscribe

चेन्नईचा संघ याआधी तब्बल आठ वेळा अंतिम सामन्यात खेळला होता.

तीन वेळा आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्स संघ यंदा प्ले-ऑफच्या स्पर्धेतून बाद झाला आहे. रविवारी रात्री झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला आठ विकेट राखून पराभूत केले. राजस्थानच्या या विजयामुळे चेन्नईवर स्पर्धेबाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे. यंदा आयपीएलचा तेरावा मोसम आहे. याआधी झालेल्या १२ पैकी १० मोसमांत (दोन वर्षे बंदी घालण्यात आली होती) चेन्नईचा संघ खेळला होता. त्यांनी १० पैकी १० वेळा प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला होता आणि तब्बल आठ वेळा हा संघ अंतिम सामन्यात खेळला होता. यंदा मात्र आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईच्या संघाला प्ले-ऑफ गाठण्यात अपयश आले आहे.

आठ गुणांसह गुणतक्त्यात तळाला

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नईला यंदाच्या आयपीएल मोसमात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्यांनी आतापर्यंत १२ पैकी केवळ ४ सामने जिंकले. त्यामुळे हा संघ आठ गुणांसह गुणतक्त्यात तळाला आहे. रविवारी झालेल्या दुपारच्या सामन्यात चेन्नईने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभवाचा धक्का दिला होता. मात्र, रात्री झालेल्या सामन्यात राजस्थानने मुंबईला पराभूत केल्याने चेन्नईचा संघ प्ले-ऑफच्या स्पर्धेतून बाद झाला. चेन्नईचा संघ आता स्पर्धेबाहेर झाला असला तरी कर्णधार धोनीने प्ले-ऑफच्या आशा या सामन्यापूर्वीच सोडल्या होत्या.

- Advertisement -

उर्वरित सामने ठरू शकतील फायदेशीर 

मागील शुक्रवारी चेन्नईवर मुंबईने मात केली होती. या पराभवानंतर धोनी म्हणाला, आम्ही प्ले-ऑफच्या स्पर्धेतून बादच झालो आहोत. मात्र, पुढील वर्षीच्या तयारीसाठी आम्ही उर्वरित तीन सामन्यांचा उपयोग केला पाहिजे. पुढील मोसमात आमचे फलंदाज कोण असणार? अखेरच्या षटकांमध्ये कोणता गोलंदाज चांगली कामगिरी करू शकतो? हे जाणून घेण्यासाठी आम्हाला हे तीन सामने फायदेशीर ठरू शकतील. आमचे खेळाडू दबाव योग्यपणे हाताळतील अशी मला आशा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -