प्रतिस्पर्ध्यांसाठी ‘डबल ट्रबल’!

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला एकही सामना जिंकता आला नाही. मात्र, भारतीय संघ या सामन्यांत ज्याप्रकारे खेळला, त्याने नवे प्रशिक्षक रीड खुश होते. त्यांचा आनंद द्विगुणित झाला, जेव्हा भारताने भुवनेश्वर येथे झालेली एफआयएच सिरीज फायनल स्पर्धा जिंकली. यानंतर भारताने अनेक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीतही ऑलिम्पिक हॉकी चाचणी स्पर्धेत यश मिळवले. या स्पर्धेमध्ये जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानी असणार्‍या मलेशिया, जागतिक क्रमवारीत ८ व्या स्थानी असणार्‍या न्यूझीलंड आणि घरच्या मैदानावर खेळणार्‍या जपानचा समावेश होता. त्यामुळे हा विजय मोठा नसला, तरी संघातील युवा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा नक्कीच होता.

Mumbai

काही दिवसांपूर्वीच टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक हॉकी चाचणी स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही संघांनी जेतेपद पटकावले. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असणारा भारताचा पुरुष संघ ही स्पर्धा जिंकेल हे अपेक्षितच होते. मात्र, भारताचा महिला संघही जिंकल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेला ऑस्ट्रेलियाचा महिला संघही सहभागी झाला होता. त्यांच्याविरुद्धच्या साखळी सामन्यात भारताने २-२ अशी बरोबरी केली. एकही साखळी सामना जिंकता न आल्याने ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत प्रवेश केला नाही. भारतीय महिला संघाने यजमान जपानवर २-१ अशी मात करत ही स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत जगातील सर्व सर्वोत्तम संघ खेळले नाहीत. त्यामुळे या निकालांना फार महत्त्व देणे योग्य ठरणार नाही. मात्र, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या २०२० टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीआधी मिळालेल्या या यशामुळे दोन्ही संघांचा आत्मविश्वास वाढला असेल हे नक्की. मागील वर्षी भारतामध्ये झालेल्या पुरुष वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा हॉलंडने १-२ असा पराभव केला. त्यामुळे भारताचे घरच्या मैदानावर वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

पण या स्पर्धेत केलेल्या झुंजार खेळामुळे भारतीय संघाचे कौतुक झाले. मात्र, असे असतानाही प्रशिक्षक हरेंदर सिंग यांना प्रशिक्षकपदावरून हटवण्यात आले. त्यांच्या जागी ऑस्ट्रेलिया आणि हॉलंडचे माजी प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांची यावर्षी एप्रिलमध्ये प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात संघाच्या कामगिरीत आणि खेळण्याच्या पद्धतीत सकारात्मक बदल झाले आहेत. त्यांच्या निवडीनंतर भारत सर्वात आधी ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर गेला. या दौर्‍यात भारताने ऑस्ट्रेलिया ‘अ’ आणि स्थानिक संघाविरुद्ध विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला एकही सामना जिंकता आला नाही. मात्र, भारतीय संघ या सामन्यांत ज्याप्रकारे खेळला, त्याने नवे प्रशिक्षक रीड खुश होते. त्यांचा आनंद द्विगुणित झाला, जेव्हा भारताने भुवनेश्वर येथे झालेली एफआयएच सिरीज फायनल स्पर्धा जिंकली. यानंतर भारताने अनेक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीतही ऑलिम्पिक हॉकी चाचणी स्पर्धेत यश मिळवले. या स्पर्धेमध्ये जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानी असणार्‍या मलेशिया, जागतिक क्रमवारीत ८ व्या स्थानी असणार्‍या न्यूझीलंड आणि घरच्या मैदानावर खेळणार्‍या जपानचा समावेश होता. त्यामुळे हा विजय मोठा नसला, तरी संघातील युवा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा नक्कीच होता.

भारतीय पुरुष हॉकी संघाची मागील काही वर्षांतील कामगिरी चढ-उतारांनी भरलेली आहे. २०१८ मध्ये झालेल्या अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताने निराशाजनक प्रदर्शन केले. या स्पर्धेत त्यांना पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीत पराभव झाला, तर कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर मात केली. २०१८ मध्येच झालेल्या एशियाडमध्ये भारताने ५ पैकी ५ साखळी सामने जिंकत सुवर्णपदक पटकावण्याचे दावेदार असल्याचे दाखवून दिले. मात्र, उपांत्य फेरीत मलेशियाच्या हातून भारताचा पराभव झाला. पण तिसर्‍या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर २-१ अशी मात केली. यावर्षी अझलन शाह स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यात भारताला यश आले. कर्णधार मनप्रीत सिंग, गोलरक्षक श्रीजेश, हरमनप्रीत सिंग, मनदीप सिंग यांनी भारताच्या कामगिरीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे आगामी ऑलिम्पिक पात्रता फेरीत प्रतिस्पर्ध्यांना भारताला रोखणे अवघड जाणार आहे.

पुरुष संघांप्रमाणेच भारताच्या महिला हॉकी संघानेही मागील काही वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी जपानवर मात करत ऑलिम्पिक हॉकी चाचणी स्पर्धेचे जेतेपद मिळवले. भारतीय महिला संघ सध्या क्रमवारीत दहाव्या स्थानी आहे. २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत महिला संघाला उपांत्य फेरी गाठण्यात यश आले होते. या फेरीत त्यांना बलाढ्य ऑस्ट्रेलियाने १-० असे पराभूत केले. त्यानंतर कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा ६-० असा धुव्वा उडवला. मात्र, याच इंग्लंडला साखळी सामन्यात पराभूत करण्यात भारताला यश आले होते. त्यानंतर लंडन येथे झालेल्या महिला वर्ल्डकपमध्ये भारतीय महिला संघाने इंग्लंड आणि अमेरिका यांना बरोबरीत रोखले, तर इटलीचा ३-० असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. या फेरीत आयर्लंडने मात केल्याने भारताचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंगले. पण महिला वर्ल्डकपमधील भारताची ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी होती. जकार्ता येथे झालेल्या एशियाडमध्ये भारताने रौप्यपदक पटकावले होते. यावरूनच या संघाचे सातत्य दिसून येते. या संघाची भिस्त कर्णधार राणी रामपाल, लालरेम्सिआमी, गुरजीत कौर, गोलरक्षक सविता यांच्यावर आहे.

२०१६ साली तब्बल ३६ वर्षांनंतर भारतीय महिला संघाला ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यात यश आले होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये हा संघ १२ व्या स्थानी राहिला होता. या स्पर्धेत त्यांना एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे २०२० टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र होत, आपल्या प्रदर्शनात सुधारणा करण्याचे महिला संघाचे लक्ष्य असेल.