घरक्रीडासिंधू, साई प्रणितची विजयी सुरुवात

सिंधू, साई प्रणितची विजयी सुरुवात

Subscribe

डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धा

भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू आणि विश्व विजेत्या पी.व्ही. सिंधूने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. पुरुष एकेरीत साई प्रणितला, तसेच पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीलाही पहिल्या फेरीतील सामना जिंकण्यात यश आले. सात्विकसाईराज-चिराग यांनी किम जी जुंग आणि ली याँग डे या कोरियन जोडीवर २४-२२, २१-११ असा सरळ गेममध्ये विजय मिळवला.

महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत पाचव्या सीडेड सिंधूने इंडोनेशियाच्या मारिस्का तुंजुंगचा २२-२०, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला. ३८ मिनिटे चाललेल्या या सामन्याच्या पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडू चांगल्या खेळल्या. या गेममध्ये सिंधू १३-१६ अशी पिछाडीवर होती. तसेच ती १९-२० अशीही मागे पडली होती. मात्र, तिने सलग तीन गुण मिळवत पहिला गेम जिंकला. दुसर्‍या गेमच्या सुरुवातीला मारिस्काने उत्तम खेळ करत ९-६ अशी आघाडी मिळवली.

- Advertisement -

यानंतर दोघींनी एकमेकींना चांगली टक्कर दिली. त्यामुळे मारिस्काकडे १७-१६ अशी केवळ एका गुणाची आघाडी होती. मात्र, सिंधूने यानंतर आक्रमक खेळ करत हा गेम २१-१८ असा जिंकला आणि स्पर्धेत आगेकूच केली. तिचा पुढील फेरीत दक्षिण कोरियाच्या एन से यंगशी सामना होईल. सिंधू आणि यंग यांच्यात याआधी एकही सामना झालेला नाही.

जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावणार्‍या प्रणितने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत चीनचा महान खेळाडू लिन डॅनला २१-१४, २१-१७ असे पराभूत केले. प्रणितसमोर दुसर्‍या फेरीत जपानचा विश्व विजेता केंटो मोमोटा आणि हाँगकाँगचा वॉन्ग विंग की व्हिन्सेंट यांच्यातील सामन्याच्या विजेत्याचे आव्हान असेल.

- Advertisement -

कश्यप, सौरभ वर्मा पराभूत

भारताचे बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप आणि सौरभ वर्मा यांना डेन्मार्क ओपनच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. कोरिया ओपनची उपांत्य फेरी गाठणार्‍या कश्यपवर थायलंडच्या सिथीकोम थमासिनने १३-२१, १२-२१ असा विजय मिळवला. सौरभला हॉलंडच्या मार्क काल्योवने २१-१९, ११-२१, १७-२१ असे पराभूत केले. सौरभने या सामन्याचा पहिला गेम जिंकला होता. मात्र, दुसर्‍या आणि तिसर्‍या गेममध्ये त्याला चांगला खेळ करता आला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -