football friendlies : इंग्लंडने केला वेल्सचा पराभव 

कॅल्व्हर्ट-लेव्हिनने पदार्पणातच गोल केला.   

england football team
डॅनी इंग्स आणि डॉमिनिक कॅल्व्हर्ट-लेव्हिन

डॉमिनिक कॅल्व्हर्ट-लेव्हिनने केलेल्या गोलच्या जोरावर इंग्लंडने आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात वेल्सचा ३-० असा पराभव केला. कॅल्व्हर्ट-लेव्हिनचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता आणि त्याला पदार्पणात गोल करण्यात यश आले. कॅल्व्हर्ट-लेव्हिन यंदाच्या फुटबॉल मोसमात चांगल्या फॉर्मात आहे. त्याने एव्हर्टन संघाकडून खेळताना यंदा सहा सामन्यांत नऊ गोल केले आहेत. इंग्लंडचे इतर दोन गोल कॉनर कोडी आणि डॅनी इंग्स यांनी केले. या दोघांचेही हे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील पहिलेच गोल ठरले.

या सामन्याची इंग्लंडने आक्रमक सुरुवात केली. त्यांनी वेल्सच्या बचाव फळीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. याचा फायदा त्यांना २६ व्या मिनिटाला झाला. जॅक ग्रिलीशच्या क्रॉसवर कॅल्व्हर्ट-लेव्हिनने गोल करत इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी मध्यंतरापर्यंत राखली. उत्तरार्धातही इंग्लंडने चांगला खेळ सुरु ठेवला. त्यांनी आक्रमक खेळ करतानाच भक्कम बचावही केला. ५३ व्या मिनिटाला इंग्लंडची आघाडी दुप्पट झाली, जेव्हा सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व करणाऱ्या किरन ट्रिपिएरच्या पासवर बचावपटू कॉनर कोडीने गोल केला. यानंतर डॅनी इंग्सने ‘ओव्हरहेड’ किक मारत इंग्लंडचा आणखी एक गोल केला. वेल्सला पुढे पुनरागमन करता आले नाही आणि इंग्लंडने सामन्यात ३-० अशी बाजी मारली.

दुसरीकडे बेल्जियम आणि आयवरी कोस्ट यांच्यातील आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना १-१ असा बरोबरीत संपला. या सामन्यामध्ये पूर्वार्धात गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात मात्र सामन्यात रंगत आली. ५३ व्या मिनिटाला मिची बाश्वाईने गोल करत बेल्जियमला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत राखत ते हा सामना जिंकणार असे वाटत असतानाच आयवरी कोस्टला पेनल्टी मिळाली. यावर फ्रॅंक केसी यांनी गोल केल्याने सामना १-१ असा बरोबरीत संपला.