IND vs AUS : कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेवर दबाव – पॉन्टिंग 

तीन कसोटीत रहाणे भारताचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा आहे. 

ajinkya rahane and virat kohli
अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली

भारताचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील तीन सामन्यांना मुकणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. कोहली पितृत्व रजेवर जाणार असून या मालिकेतील पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत भारताच्या इतर फलंदाजांवर आणि खासकरून अजिंक्य रहाणेवर अधिक दबाव असणार आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले.

कोहली केवळ एकच कसोटी सामना खेळणार आहे. उर्वरित तीन सामन्यांत भारतीय संघाला त्याची उणीव नक्कीच भासेल.कोहली उत्कृष्ट फलंदाज आणि तितकाच चांगला कर्णधार आहे. त्याच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंवरील दबाव वाढेल. कोहली भारतात परतल्यावर अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे त्याच्यावरही खूप दबाव असणार आहे. तसेच कोहलीच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज खेळणार? हासुद्धा भारतीय संघापुढे मोठा प्रश्न आहे. इतकेच नाही, तर पहिल्या कसोटीतही कोणता फलंदाज कोणत्या क्रमांकावर खेळणार? याचीही भारतीय संघाला कल्पना आहे, असे मला वाटत नाही. सलामीवीर म्हणून कोण खेळणार? पहिल्या कसोटीनंतर कोहलीची जागा कोण घेणार? हे अजूनही निश्चित नसल्याचे पॉन्टिंग म्हणाला.

सेच मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी बाजी मारली होती. मात्र, त्या मालिकेत स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर हे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज खेळले नव्हते व याचा भारतीय संघाला फायदा झाला, असेही पॉन्टिंगने नमूद केले.