इंडोनेशिया मास्टर्स : सायना, सिंधू कामगिरी उंचावणार?

Mumbai
saina vs pv
पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल

पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या भारताच्या दोन स्टार बॅडमिंटनपटू मंगळवारपासून सुरु होणार्‍या इंडोनेशिया मास्टर्स सुपर ५०० स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत आमनेसामने येण्याची शक्यता आहे. या स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. विश्वविजेती सिंधू आणि गतविजेत्या सायनाने नव्या मोसमाची चांगली सुरुवात केली होती. मागील आठवड्यात झालेल्या मलेशिया मास्टर्स स्पर्धेत सिंधू आणि सायनाला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले होते. मात्र, आता दोघींचेही कामगिरी उंचावत इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकण्याचे लक्ष्य असेल.

मलेशिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये सिंधूला चिनी तैपेईच्या ताई झू यिंगने १६-२१, १६-२१ असे, तर सायनाला तीन वेळच्या विश्वविजेत्या कॅरोलिना मरीनने ८-२१, ७-२१ असे पराभूत केल्याने त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. आता इंडोनेशिया मास्टर्सच्या पहिल्या फेरीत पाचव्या सीडेड सिंधूसमोर जपानच्या अया ओहोरीचे, तर सायनासमोर जपानच्याच सयाका ताकाहाशीचे आव्हान असेल.

दोघींनीही आपापल्या लढती जिंकल्यास दुसर्‍या फेरीत त्या आमनेसामने येतील. आतापर्यंत सिंधू आणि सायनामध्ये चार सामने झाले आहेत. यापैकी ३ सामने सायनाने, तर केवळ १ सामना सिंधूने जिंकला आहे. प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये सिंधूने बरेचदा सायनावर मात केली आहे, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर सायनाविरुद्ध तिला फारसे मिळवता आलेले नाही.

किदाम्बी श्रीकांतवर नजर
इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेमध्ये पुरुषांत किदाम्बी श्रीकांतच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. त्याला यंदाच्या मोसमाच्या चांगली सुरुवात करता आली नाही. मलेशिया मास्टर्सच्या पहिल्याच फेरीत त्याच्यावर स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे तो आपल्या कामगिरी सुधारणा करण्यास उत्सुक असेल. त्याचा इंडोनेशिया मास्टर्सच्या पहिल्या फेरीत शेसर हिरेन ऋस्टविटोशी सामना होईल. पुरुष एकेरीतच जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या साई प्रणितचा सामना चीनच्या शी यु क्वीशी, तर पारुपल्ली कश्यपचा सामना अँथनी सिनीसुका गिंटिंगशी होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here