चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हे आयपीएल ठरवेल!

सौरव गांगुलीचे मत

Mumbai
Sourav Ganguly

मे महिन्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणार्‍या विश्वचषकासाठी भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोणी खेळावे याबाबत खूप चर्चा होत आहे. भारताने मागील काही वर्षांत अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, अंबाती रायडू अशा विविध फलंदाजांना चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली. मात्र, कोणालाही आपले स्थान पक्के करता आले नाही. त्यामुळे आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मते काही दिवसांत सुरू होणारी आयपीएल स्पर्धाच भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हे ठरवेल.

चौथ्या क्रमांकासाठी भारताकडे बरेच पर्याय आहेत, पण आता आयपीएलच ठरवेल की या क्रमांकावर कोण खेळणार. मी चेतेश्वर पुजारा सर्वोत्तम पर्याय असेल असे म्हटले कारण तो चांगल्या फॉर्मात आहे. मी कर्णधार असताना राहुल द्रविडने जशी भूमिका बजावली होती, तशीच भूमिका तो बजावू शकेल, असे मला वाटते. जर तुमच्याकडे फारसे पर्याय नसतील तर पुजाराला संधी देता येईल. पंत किंवा रायडू हेसुद्धा पर्याय आहेत. आपण सर्वच आपली मते समोर ठेऊ शकतो, पण मला वाटते की विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हे आधीच माहीत आहे, असे गांगुली म्हणाला.

तसेच भारतीय संघ कोहलीवर एकट्यावर अवलंबून नाही, असेही त्याने सांगितले. भारताकडे खूप चांगले खेळाडू आहेत. मला असे वाटले नव्हते की आपला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पराभव होईल. या संघात खूप प्रतिभा आहे. मला दावेदार वैगेरेचा टॅग द्यायला आवडत नाही, पण भारतीय संघ हा विश्वचषक जिंकण्याचा प्रमुख दावेदार आहे. या संघात धवन, रोहित, धोनी, कोहली, बुमराह असे बरेच अप्रतिम खेळाडू आहेत. कोहली हा महान खेळाडू आहे. प्रत्येक पिढीमध्ये एक महान खेळाडू असतोच, पण भारतीय संघ त्याच्या एकट्यावरच अवलंबून आहे असे मला वाटत नाही, असे गांगुली म्हणाला.

आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सचा सल्लागार म्हणून निवड झालेल्या गांगुलीने युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतचीही स्तुती केली. पंत मागील आयपीएलमध्ये खूपच चांगला खेळला, पण भारताच्या एकदिवसीय संघात महेंद्रसिंग धोनी असल्यामुळे त्याला सातत्याने सामने खेळायला मिळत नाहीत. मात्र, तो भारतीय संघाचे भविष्य आहे. पुढील १० वर्षे तो तुम्हाला खूप सामने खेळताना दिसेल, असे गांगुलीने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here