घरक्रीडावसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेत आर्मीच्या करण सिंगची बाजी

वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेत आर्मीच्या करण सिंगची बाजी

Subscribe

रविवार, ९ डिसेंबरला पार पडलेल्या महापौर मॅरेथॉनमध्ये आर्मीच्या करण सिंग यांनी बाजी मारली.

वसई-विरार महापालिका आयोजित ८ वी महापौर मॅरेथॉन स्पर्धा रविवार, ९ डिसेंबरला पार पडली. या स्पर्धेतील ४२ किलोमीटर फुल मॅरेथॉनमध्ये आर्मीच्या करण सिंग यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी ४२ किमीचे अंतर २ तास २२ मिनिटे १७ सेकंदात पूर्ण करत ही स्पर्धा जिंकली.
विरार पश्चिमेकडील विवा महाविद्यालयाजवळून सुरु झालेल्या मॅरेथॉनला महापौर रुपेश जाधव, अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, माजी महापौर प्रविणा ठाकूर, राजीव पाटील यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते. फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, महिला गट, जेष्ठ नागरिकांचा गट, १६ वर्षाखालील गट अशा विविध गटांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत १८ हजार स्पर्धक सहभागी झाले होते.
फुल मॅरेथॉनमध्ये करण सिंग यांनी पहिला क्रमांक पटकावला तर लालजी यादव (२ तास २२ मिनिटे ५८ सेकंद) आणि सनवरु यादव (२ तास २४ मिनिटे ४ सेकंद) यांना अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. २१ किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये आर्मीच्याच शंकर थापाने १ तास ५ मिनिटे ४८ सेकंदाचा वेळ घेत प्रथम क्रमांक पटकावला. तर दुर्गा बहादुर सिंग (१ तास ६ मिनिटे ४ सेकंद) आणि गोविंद सिंग (१ तास ६ मिनिटे ४ सेकंद) यांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. महिलांच्या गटात हाफ मॅरेथॉनमध्ये प्राजक्ता गोडबोले यांनी १ तास १८ मिनिटे ५६ सेकंदांत अंतर पूर्ण करत १ लाख २५ हजार रुपयांचे पारितेषिक पटकावले. तर मंजु यादव (१ तास १९ मिनिटे ३० सेकंद) आणि आरती पाटील (१ तास १९ मिनिटे ५० सेकंद) यांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला.
कॅन्सरविरोधात ७२ वर्षीय शिक्षकाची धाव
तंबाखुमुळे कॅन्सर होतो, मलाही झाला, तुम्ही ध्रुमपान टाळा. असा संदेश घेऊन गुजरातमधील ७२ वर्षीय शिक्षक अश्विन मेहता मॅरेथॉनमध्ये धावले. त्यांचा संदेश पोहोचवण्यासाठी त्यांनी आतापर्यंत २१ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -