घरक्रीडाखो-खोमध्ये महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार

खो-खोमध्ये महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार

Subscribe

 खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील खो-खोमध्ये महाराष्ट्राने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील मुले-मुली संघांपाठोपाठ १७ वर्षांखालील मुले-मुली संघांनी सुवर्णपदकाची कमाई केली. खो-खो चार सुवर्णपदके मिळवण्याची ही महाराष्ट्राची सलग तिसरी वेळ होती.

खो-खोतील १७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने गुजरातवर १९-११ अशी सहज मात केली. या सामन्याची महाराष्ट्राने आक्रमक सुरुवात केली. त्यामुळे मध्यंतराला त्यांच्याकडे १०-५ अशी भक्कम आघाडी होती. त्यांनी उत्तरार्धातही आपला चांगला खेळ सुरु ठेवत हा सामना ८ गुणांच्या फरकाने जिंकत सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राच्या या विजयात रामजी कश्यप (४.३० मिनिटे संरक्षण आणि एक बळी), ह्रषिकेश शिंदे (२.२० मिनिटे संरक्षण आणि ४ बळी), सिद्धेश थोरात (२.०० मिनिटे संरक्षण आणि ५ बळी) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात दिल्लीला १४-८ असे पराभूत करत सुवर्णपदक मिळवले. या सामन्याच्या पूर्वार्धात महाराष्ट्राने चांगला खेळ केल्याने मध्यंतराला त्यांच्याकडे ९-४ अशी आघाडी होती. त्यांनी उत्तरार्धातही गुजरात फारसे गुण मिळवण्याची संधी दिली नाही. महाराष्ट्राकडून प्रांजल मडकर (२.४०, १.२० मिनिटे संरक्षण आणि १ बळी), प्रिती काळे (१.१०, ४.०० मिनिटे संरक्षण आणि १ बळी), किरण शिंदे (१.३०, २.०० मिनिटे संरक्षण आणि २ बळी) यांनी अप्रतिम खेळ केला.

महाराष्ट्राने या स्पर्धेतील खो-खोमध्ये २१ वर्षांखालील मुले-मुली या दोन्ही गटांत सुवर्णपदक मिळवले होते. नवी दिल्ली (२०१८) आणि पुणे (२०१९) येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेच्या पहिल्या दोन पर्वांतही महाराष्ट्राला चारही गटांमध्ये जेतेपद मिळाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -