धोनीलाच खेळायचं नाही? रवी शास्त्री म्हणतात, ‘वर्ल्डकपपासून धोनी भेटलाच नाही’!

भारताचा माजी कप्तान महेंद्रसिंह धोनी निवृत्तीच्या विचारात असल्याची गंभीर चर्चा सुरू असून वर्ल्डकपपासून धोनी आपल्याला भेटलाच नसल्याचं भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.

Mumbai
ravi shastri ms dhoni
महेंद्रसिंह धोनी, रवी शास्त्री

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान आणि प्रत्यक्ष वर्ल्डकपमध्ये भारताला विजय मिळवून देणारा कॅप्टन कूल अर्थात महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीवरून सुरू असलेली चर्चा थांबायचं नाव घेत नाहीये. नुकताच भारताचा कप्तान विराट कोहली याने धोनीचा एक फोटो शेअर केल्यामुळे धोनीच्या निवृत्तीवरून मोठी चर्चा सुरू झाली होती. धोनी निवृत्ती घेणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात होती. मात्र, या चर्चा चुकीच्या असल्याचं विराट कोहलीनं स्पष्ट केलं होतं. मात्र, आता टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनीच धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना नवी सुरुवात करून दिली आहे. ‘वर्ल्डकप झाल्यापासून मी धोनीला भेटलोच नाहीये’, असं रवी शास्त्री यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे धोनी खरंच निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

‘परत यायचं की नाही, हे धोनीनं ठरवावं!’

सध्या भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात टीमच्या सरावादरम्यान रवी शास्त्रींनी धोनीबद्दलच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘या वर्षी झालेल्या वर्ल्डकपनंतर माझी आणि धोनीची भेट झालेली नाही. त्याला पुनरागमन करायचं आहे की नाही, हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे. त्याने आधी खेळायला सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर काय होतंय ते पाहाता येईल. वर्ल्डकपनंतर त्याने कोणत्याही प्रकारचं क्रिकेट खेळलेलं नाही. जर त्याची खरंच खेळायची इच्छा असेल, तर त्याने निवड समितीला तसं सांगायला हवं. भारताच्या सर्वकालीक महान खेळाडूंमध्ये त्याचं नाव खूप वर असणार आहे’, असं रवी शास्त्री म्हणाले. त्यामुळे नक्की धोनीच्या खेळण्याचं घोडं कुठे अडलं आहे? यावर चर्चा सुरू झाली आहे.

धोनीचे चाहते पुनरागमनाच्या प्रतिक्षेत

दक्षिण आफ्रिकेविरूद्धची सीरीज सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीने धोनीसोबत बॅटिंग करत असल्याचा २०१६मधला एक फोटो शेअर केला होता. त्यामुळे त्याच्या निवृत्तीची चर्चा जोर धरू लागली होती. धोनीने स्वत:च आपण दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्याचं निवड समितीला कळवलं होतं. मात्र, आता धोनीचे असंख्य चाहते त्याच्या पुनरागमनाची प्रतिक्षा करत आहेत.