Positive News: कोरोनाला हरवून ७३ वर्षीय आजोबांनी पुर्ण केली ४२ किमींची मॅरेथॉन

Kamalaksha Rao run london marathon
कमलक्षा राव

कोरोना विषाणूचा धोका हा वृद्धांना अधिक असल्याचे सांगितले जात होते. मात्र हा समज चुकीचा असल्याचे अनेक उदाहरणांवरुन दिसून आलेले आहे. शंभरी पार केलेल्या अनेक नागरिकांनी आजवर कोरोनावर मात केलेली आहे. आता मुंबईतील एका ७३ वर्षीय आजोबांनी फक्त कोरोनावर मात केली नाही, तर त्यानंतर ४२ किमींची मॅरेथॉन देखील पुर्ण केली. मुंबईच्या मालाड येथे राहणारे कमलक्षा राव (Kamalaksha Rao) यांनी हा अजब कारनामा करुन दाखवला. वाढतं वय हा फक्त आकडा असून तुमच्यात इच्छाशक्ती असेल तर अवघड काहीच नाही, हेच पुन्हा एकदा कमलक्षा राव यांनी सिद्ध करुन दाखविले.

टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. कमलक्षा राव यांनी लंडन मधील व्हर्च्युअल मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. ४२ किलोमीटरची ही मॅरेथॉन त्यांनी ७ तासांत पुर्ण केली. कमलक्षा राव हे दोन महिन्यापुर्वी कोरोना बाधित झाले होते. २४ जुलै रोजी जेव्हा त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, तेव्हा रिपोर्टच्या आधीच त्यांनी १० किलोमीटरची रनिंग पुर्ण केली होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानतंर त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करुन घेतले होते.

View this post on Instagram

Ran virtual London marathon 42k

A post shared by Kamalaksha Rao (@kamalax) on

कमलक्षा राव यांनी सहा दिवस घरात काढले, तीन दिवस रुग्णालयात आणि पुढचे ११ दिवस शेजारीच मोकळ्या असलेल्या घरात क्वारंटाईन राहिल्यानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. रिपोर्ट निगेटिव्ह येताच त्यांनी कार्डिओलॉजिस्टची वेळ घेतली आणि रिपोर्ट काढण्याचे ठरविले. रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर डॉक्टारांनी त्यांना रनिंग सुरु ठेवण्याचा ग्रीन सिग्नल दिला. त्याप्रमाणे सोमवार ५ ऑक्टोबर रोजी राव यांनी मॅरेथॉनमध्ये व्हर्च्युअली सहभाग नोंदविला.

६७ वर्षी घेतला रनिंगचा निर्णय

कमलक्षा राव हे २००४ साली टेक्सटाईल कंपनीतून निवृत्त झाले आहेत. वयाच्या ६७ वर्षी त्यांनी रनिंग करण्याचे आपले स्वप्न करण्याचा निर्णय घेतला. “मी सकाळी रनिंग करणाऱ्या लोकांना पाहून मी देखील धावू शकतो का? असे त्यांना विचारले. लोकांनीही माझा उत्साह वाढवला आणि मी धावायला लागलो.”, अशी प्रतिक्रिया राव यांनी दिली. राव यांनी पुर्ण मॅरेथॉन सोबतच अल्ट्रा मॅरेथॉनमध्येही याआधी सहभाग घेतलेला आहे. जेव्हा लॉकडाऊन अधिक कडक झाला होता, तेव्हा राव यांनी घरातल्या घरातच ५० किमी पळण्याचा सराव केला होता.