द्रविडची ‘कॉपी’ करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही – पुजारा

द्रविड आणि माझ्या खेळण्याच्या पद्धतीत, शैलीत साम्य आहे. द्रविड हा माझा आदर्श आहे, पण मी कधीही त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न केला नाही, असे पुजारा म्हणाला.

New Delhi
चेतेश्वर पुजारा

भारतीय कसोटी संघातील प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजाराची भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडसोबत बरेचदा तुलना होते. पुजाराच्या आधी द्रविड अनेक वर्षे भारतीय कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असणाऱ्या द्रविडप्रमाणेच पुजाराही चिकाटीने, संयमाने फलंदाजी करतो. तसेच पुजाराही त्याच्या भक्कम बचावासाठी ओळखला जातो. खेळपट्टीवर काही काळ टिकल्यानंतर त्याला बाद करणे भल्याभल्या गोलंदाजांना अवघड जाते. त्यामुळे पुजाराची द्रविडशी तुलना केली जाते. मात्र, आमच्या दोघांच्या खेळण्याच्या पद्धतीत साम्य असले, तरी मी कधीही द्रविडची ‘कॉपी’ करण्याचा प्रयत्न केला नाही, असे पुजाराने एका क्रिकेट वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

द्रविड माझा आदर्श

द्रविड आणि माझ्या खेळण्याच्या पद्धतीत, शैलीत साम्य आहे. द्रविड हा माझा आदर्श आहे, पण मी कधीही त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न केला नाही. सौराष्ट्रकडून खेळताना मला जे अनुभव आले आहेत, त्यामुळे माझी खेळण्याची शैली तयार झाली. तिथे शतक केले म्हणून तुम्ही समाधान मानू शकत नाही. तुमच्या संघासाठी तुम्हाला मोठ्या धावा कराव्या लागतात. तिथेच मला जबाबदारीने खेळणे काय असते आणि संघ जिंकावा म्हणून मोठी धावसंख्या उभारणे किती महत्त्वाचे असते हे कळले, असे पुजारा म्हणाला.

द्रविडच्या सल्ल्याला खूप महत्त्व

द्रविडने पुजाराच्या आयुष्यात आणि क्रिकेट कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. क्रिकेट सुरु नसताना त्यापासून दूर जाणे किती महत्त्वाचे आहे हे मला द्रविडने शिकवले. यासाठी मी कायम त्याचा ऋणी राहीन. माझ्या आणि द्रविडच्या विचारांमध्ये साम्य होते. मात्र, त्याच्याशी चर्चा केल्यानंतर मला अधिक स्पष्टता मिळाली. कौंटी क्रिकेटमध्येही खेळाडू व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य वेगवेगळे ठेवतात. मी द्रविडच्या सल्ल्याला खूप महत्त्व देतो. मी क्रिकेटचा खूप विचार करतो. परंतु,क्रिकेट पलीकडेही आयुष्य आहे हे आता मला कळले आहे, असे पुजाराने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here