स्मिथ मी पाहिलेला सर्वोत्तम क्रिकेटपटू – कर्णधार पेन

Mumbai

स्टिव्ह स्मिथ हा मी पाहिलेला सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे, अशा शब्दांमध्ये कर्णधार टीम पेनने ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख फलंदाजाची स्तुती केली. अ‍ॅशेसमधील चौथ्या कसोटीत विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली. या विजयामुळे अ‍ॅशेसचा अर्न आपल्याकडे राहणार हेदेखील ऑस्ट्रेलियाने सुनिश्चित केले. मँचेस्टर येथे झालेला हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडसमोर ३८३ धावांचे आव्हान होते. याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १९७ धावांत आटोपला. या सामन्याच्या पहिल्या डावात २११ आणि दुसर्‍या डावात ८२ धावा करणार्‍या स्मिथला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे चौथ्या सामन्यानंतर पेनने संघातील सहकारी स्मिथचे कौतुक केले.

स्मिथ हा मी पाहिलेला सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे. तो किती अप्रतिम खेळाडू आहे, हे त्याने पुन्हा एकदा या सामन्यात सिद्ध केले. त्याला कोणत्या परिस्थितीमध्ये कशाप्रकारे फलंदाजी केली पाहिजे, हे माहीत आहे, असे पेन म्हणाला. स्मिथने या मालिकेत उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत ५ डावांमध्ये १३४.२ च्या सरासरीने ६७१ धावा फटकावल्या आहेत. यात तीन शतकांचा समावेश आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनीही स्मिथची स्तुती केली. आमच्या संघात सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज (पॅट कमिन्स) आणि कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. विराट कोहली हा मी पाहिलेला सर्वोत्तम फलंदाज आहे, असे मला या मालिकेआधी वाटत होते. मात्र, स्मिथच्या सध्याच्या फलंदाजीचा स्तर त्याहूनही वरचा आहे. त्याला जी धावांची भूक आहे, ती मी याआधी कोणत्याही खेळाडूमध्ये पाहिलेली नाही, असे लँगर म्हणाले.

स्मिथ ‘चीटर’च राहणार -हार्मिसन

स्टिव्ह स्मिथने कितीही चांगली कामगिरी केली, तरी तो कायम ‘चीटर’ म्हणूनच ओळखला जाणार आहे, असे विधान इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टिव्ह हार्मिसनने केले. कोणीही त्याला माफ करू शकेल, असे मला वाटत नाही. तुम्ही जेव्हा एखादे चुकीचे कृत्य करता, तेव्हा तुमच्यावर तो शिक्का पडतो. त्यानंतर तुम्ही काहीही केले, तरी तो शिक्का पुसला जात नाही. स्मिथने यापुढे कितीही चांगली कामगिरी केली तरीही त्याची आठवण दक्षिण अफ्रिकेतील त्या कृत्यासाठीच काढली जाईल, असे हार्मिसनने सांगितले. मागील वर्षी द.आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग केल्यामुळे स्मिथसह डेविड वॉर्नर आणि कॅमरुन बँक्रॉफ्ट या ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर बंदी घालण्यात आली होती.