महिला संघाला व्हाईटवॉश

भारताने हा सामना २ धावांनी गमावला.

Mumbai
cricket
क्रिकेट सामन्यादरम्यानचा फोटो

स्मृती मानधनाने ८६ धावांची अप्रतिम खेळी करूनही भारतीय महिला संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारतीय महिलांनी ३ सामन्यांची ही मालिका ३-० अशी गमावली. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले १६२ धावांचे आव्हान भारतीय संघ गाठू शकला नाही. भारताला २० षटकांमध्ये ४ विकेटच्या मोबदल्यात १५९ धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना २ धावांनी गमावला.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सलामीवीर सोफी डीवाईन आणि सुझी बेट्स यांनी डावाची चांगली सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. अरुंधती रेड्डीने बेट्सला (२४) माघारी पाठवत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. यानंतर डीवाईनने इतर फलंदाजांना हाताशी धरत संघाचा डाव सावरला. तिने भारतीय गोलंदाजांचा समाचार ५२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७२ धावांची खेळी केली. तिला कर्णधार एमी सॅटरवेटने ३१ धावा काढत चांगली साथ दिली. त्यामुळे न्यूझीलंडने २० षटकांत ७ बाद १६१ अशी धावसंख्या उभारली. भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक २ विकेट घेतल्या.

१६२ धावांचा पाठलाग करताना भारताची सलामीवीर प्रिया पुनिया अवघी १ धाव करून बाद झाली, मात्र यानंतर स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी भारताचा डाव सावरला. त्यांनी दुसर्‍या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. दरम्यान, मानधनाने आपला चांगला फॉर्म सुरू ठेवत ३३ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. जेमिमा मात्र २१ धावा करून बाद झाली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर स्वस्तात माघारी परतली. यानंतर मानधनाने मिताली राजसोबत २१ धावांची भागीदारी केली. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात ती ८६ धावांवर माघारी परतली. भारताला अखेरच्या षटकात हा सामना जिंकण्यासाठी १६ धावांची गरज होती. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मितालीने तर तिसर्‍या चेंडूवर दिप्ती शर्माने चौकार लगावला. त्यामुळे विजयासाठी भारताला ३ चेंडूंत ७ धावांची गरज होती. मात्र, यानंतर या दोघींना मोठा फटका मारता आला नाही आणि भारताचा २ धावांनी पराभव झाला. डीवाईनने गोलंदाजीतही आपली कमाल दाखवत २ विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक –

न्यूझीलंड : २० षटकांत ७ बाद १६१ (सोफी डीवाईन ७२, एमी सॅटरवेट ३१; दिप्ती शर्मा २/२८) विजयी वि. भारत : २० षटकांत ४ बाद १५९ (स्मृती मानधना ८६, मिताली राज नाबाद २४; डीवाईन २/२१).