घरक्रीडाकोण ठरणार युरोपचा किंग?

कोण ठरणार युरोपचा किंग?

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मार्चच्या मध्यापासून युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा बंद होती. परंतु, गेल्या शुक्रवारपासून या स्पर्धेला पुन्हा सुरुवात झाली. चॅम्पियन्स लीगच्या बाद फेरीतील लढतींचे विजेते हे दोन लेगमधील (एक सामना घरच्या मैदानावर, दुसरा सामना प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर) निकाल मिळून ठरवले जातात. यंदा मात्र उपांत्यपूर्व फेरीपासून केवळ एक-एक लेगच खेळवण्यात येणार असून तुलनेने दुबळ्या मानल्या जाणार्‍या संघांना बलाढ्य संघांना पराभवाचा धक्का देण्याची नामी संधी आहे. त्यामुळे यंदा अनपेक्षित विजेता मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन केले गेले, आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध घालण्यात आले होते. याचा परिणाम खेळांवरही झाला. युरोपातीलच नाही, तर व्यावसायिक फुटबॉलमधील जगातील सर्वात मोठी स्पर्धा ‘युएफा चॅम्पियन्स लीग’ अचानक थांबवावी लागली. युरोपमधील बहुतांश फुटबॉल स्पर्धा मे-जूनपासून पुन्हा सुरू झाल्या. त्यामुळे चॅम्पियन्स लीगला पुन्हा कधी सुरूवात होणार हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर या स्पर्धेच्या ‘रिस्टार्ट’ची तारीख ठरली, ७ ऑगस्ट.

कोरोनामुळे सर्व स्पर्धांमध्ये काही बदल करणे भाग पडले आणि चॅम्पियन्स लीगही याला अपवाद नाही. चॅम्पियन्स लीगच्या बाद फेरीतील लढतींचे विजेते हे दोन लेगमधील (एक सामना घरच्या मैदानावर, दुसरा सामना प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर) निकाल मिळून ठरवले जातात. यंदा मात्र उपांत्यपूर्व फेरीपासून केवळ एक-एक लेगच खेळवण्यात येणार आहे. हे सर्व सामने लिस्बन येथे होणार आहेत. तिथे घरच्या मैदानावर खेळताना मिळणारा चाहत्यांचा पाठिंबा नसेल. त्यामुळे तुलनेने दुबळ्या मानल्या जाणार्‍या संघांना बलाढ्य संघांना पराभवाचा धक्का देण्याची नामी संधी आहे. यंदा या स्पर्धेला अनपेक्षित विजेता मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

असाच एक निकाल शुक्रवारी रात्री पाहायला मिळाला. ज्युव्हेंटस हा इटलीतील सर्वात बलाढ्य आणि यशस्वी संघ! त्यांनी यंदा इटलीतील स्थानिक ‘सेरिया ए’ स्पर्धा सलग नवव्यांदा जिंकली. परंतु, त्यांना चॅम्पियन्स लीग स्पर्धेत म्हणावे तसे यश मिळालेले नाही. त्यांनी अखेरची चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकली ती १९९५-९६ मोसमात. यंदा हा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यास ते उत्सुक होते. मात्र, उप-उपांत्यपूर्व फेरीत त्यांना फ्रेंच संघ लियॉनने पराभवाचा धक्का दिला. शुक्रवारी रात्री झालेला दुसर्‍या लेगचा सामना त्यांनी क्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलमुळे २-१ असा जिंकला खरा, पण दोन लेगमध्ये मिळून ही लढत २-२ अशी बरोबरीत संपली. लियॉनने ‘अवे गोल’च्या (प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर अधिक गोल) नियमानुसार स्पर्धेत आगेकूच केली आणि “चॅम्पियन्स लीगमध्ये आमचे नशीबच खराब आहे,” असे म्हणण्याची वेळ ज्युव्हेंटसच्या प्रशिक्षकांवर आली.

चॅम्पियन्स लीग विक्रमी १३ वेळा जिंकणार्‍या रियाल माद्रिदचेही यंदाच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. शुक्रवारी झालेल्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या दुसर्‍या लेगमध्ये मँचेस्टर सिटीने रियालवर २-१ असा विजय मिळवला, तर सिटीने दोन लेगमध्ये मिळून ही लढत ४-२ अशी मोठ्या फरकाने जिंकली. सिटीलाही यंदाची स्पर्धा जिंकण्याचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु, कोरोनानंतर रियालने स्थानिक फुटबॉलमधील सर्व सामने जिंकताना ‘ला लिगा’ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले होते. त्यामुळे ते पहिल्या लेगमधील १-२ अशी पिछाडी भरून काढतील असे अनेकांना वाटले होते. परंतु, बचावपटू राफाएल वरानने केलेल्या चुका रियालला महागात पडल्या. आता सिटीचा उपांत्यपूर्व फेरीत लियॉनशी सामना होईल.

- Advertisement -

सिटीप्रमाणे यंदा चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकण्यासाठी बायर्न म्युनिक, पॅरिस सेंट जर्मान, अ‍ॅथलेटिको माद्रिद आणि बार्सिलोना यांनाही दावेदार मानले जात आहे. यांच्यात सर्वात फॉर्मात असलेला संघ म्हणजे बायर्न म्युनिक आणि सर्वात फॉर्मात असलेला खेळाडू म्हणजे बायर्नचा स्ट्रायकर रॉबर्ट लेव्हनडोस्की! कोरोनानंतर फुटबॉल पुन्हा सुरु झाल्यापासून बायर्नने सलग दहा सामने जिंकले आहेत, तर लेव्हनडोस्कीने यंदाच्या मोसमात ४३ सामन्यांत ५१ गोल केले असून युरोपमध्ये सर्वाधिक गोल करणार्‍या खेळाडूंमध्ये त्याचा अव्वल क्रमांक लागतो. त्यामुळे त्यांना हरवणे इतर संघांना अवघड जाऊ शकेल.

बार्सिलोनाचा संघ सध्या फारसा फॉर्मात नाही. परंतु, त्यांच्याकडे लिओनेल मेस्सीसारखा हुकमी एक्का असल्याने ते बाद फेरीत कोणावरही मात करु शकतील. तसेच पॅरिसही यंदाची स्पर्धा जिंकण्यास उत्सुक आहे. त्यांच्या संघात नेयमार आणि किलियन एम्बापेसारखे दोन उत्कृष्ट खेळाडू आहेत, जे कोणत्याही क्षणी सामना पॅरिसच्या बाजूने फिरवण्यात सक्षम आहेत. या संघांच्या तुलनेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवलेले अटलांटा, आरबी लॅपझिग हे संघ दुबळे मानले जात आहेत. परंतु, लॅपझिगने उप-उपांत्यपूर्व फेरीत मागील मोसमातील उपविजेते टॉटनहॅमला पराभूत केले होते, तर यंदाच्या मोसमात अटलांटा हा इटलीतील सर्वाधिक गोल करणारा संघ आहे. त्यामुळे बाद फेरीचे सामने फारच उत्कंठावर्धक होणार आहेत, हे निश्चित!

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -