घरक्रीडाधोनीच्या निवृत्तीची चर्चा कशासाठी?

धोनीच्या निवृत्तीची चर्चा कशासाठी?

Subscribe

युवराज सिंगचा सवाल

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सतत चर्चा करणे योग्य नाही, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने व्यक्त केले आहे. भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज असणार्‍या धोनीच्या भविष्याबाबत मागील काही काळात बरीच चर्चा झाली आहे. जुलैमध्ये इंग्लंडमध्ये झालेला आयसीसी विश्वचषक संपल्यानंतर धोनी निवृत्त होईल, असे म्हटले जात होते. परंतु, धोनीने अजून अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, असे असतानाही धोनीची विश्वचषकानंतर भारतीय संघात निवड झालेली नाही. धोनीने कधी निवृत्त व्हायचे त्यानेच ठरवले पाहिजे, असे धोनीचा माजी सहकारी युवराजला वाटते.

धोनीच्या निवृत्तीबाबत सतत चर्चा कशासाठी होत आहे? मला हे योग्य वाटत नाही. धोनीचे भारतीय क्रिकेटला खूप मोठे योगदान आहे. तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्यामुळे तुम्ही त्याला वेळ द्यायला हवा. कधी निवृत्त व्हायचे, याबाबतचा निर्णय त्याने स्वतःच घेतला पाहिजे. इतरांनी याबाबत काहीही बोलणे योग्य नाही. त्याला जर पुढेही खेळायचे असेल, तर त्याच्या मताचा सर्वांनी आदर केला पाहिजे, असे युवराज म्हणाला. युवराजने स्वतः यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

- Advertisement -

धोनी आणि युवा रिषभ पंत यांच्यात सतत तुलना केली जात आहे. मात्र, ही तुलना योग्य नसून धोनीची जागा कोणीही घेणे अवघड आहे, असे युवराजला वाटते. धोनीशी तुलना होणे हा पंतवर अन्याय आहे. महेंद्रसिंग धोनी एका दिवसात बनला नाही. त्याला महान खेळाडू बनण्यासाठी काही वर्षे लागली. त्यामुळे त्याच्या जवळ पोहोचण्यासाठी पंतला बरीच वर्षे लागतील. धोनीची जागा घेणारा खेळाडू भारताला सहजासहजी मिळणार नाही, असे युवराजने सांगितले.

पंतवर दबाव नको!

- Advertisement -

भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती भविष्याचा विचार करत आहे. त्यामुळे ते धोनीला भारतीय संघात स्थान न देता, रिषभ पंतला जास्तीतजास्त संधी देण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतला मात्र या संधीचे सोने करता आलेले नाही. परंतु, पंत हा युवा खेळाडू असल्याने त्याला वेळ दिला पाहिजे, असे युवराज सिंग म्हणाला. टी-२० विश्वचषकाला अजून एका वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पंतकडे अजून बराच वेळ आहे. संघ व्यवस्थापनाने त्याची मानसिकता ओळखली पाहिजे. त्याला बर्‍याच संधी मिळाल्या आहेत, हे खरे आहे. मात्र, त्याच्यावर दबाव टाकणे योग्य नाही. तो युवा खेळाडू आहे. त्याच्यावर जास्त दबाव टाकला, तर तो सर्वोत्तम खेळ करू शकणार नाही. त्याला प्रशिक्षक आणि कर्णधाराने पाठिंबा दिला पाहिजे, असे युवराजने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -