पंत दुसर्‍या वनडेला मुकणार?

Mumbai

भारताचा युवा क्रिकेटपटू रिषभ पंतला कन्कशनमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यष्टिरक्षण करता आले नाही. तसेच तो राजकोट येथे दुसर्‍या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघासोबत रवाना झाला नाही. त्याला कन्कशनच्या नियमानुसार डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तो शुक्रवारी होणार्‍या दुसर्‍या सामन्याला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारताने मुंबईत झालेला पहिला एकदिवसीय सामना गमावला. या सामन्यात पंतला फलंदाजीदरम्यान दुखापत झाली. त्याला २८ धावांवर वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने उसळी घेणारा चेंडू टाकत बाद केले. भारताच्या डावातील ४४ व्या षटकात पंतच्या बॅटची कड घेऊन चेंडू हेल्मेटला आदळला. त्यामुळे कन्कशनच्या नियमानुसार त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आणि तो यष्टिरक्षण करण्यासाठी येऊ शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलने यष्टिरक्षण केले.

कन्कशनच्या नियमानुसार खेळाडूला साधारण २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवावे लागते. त्यामुळे पंत बुधवारी संघातील इतर खेळाडूंसोबत राजकोटसाठी रवाना झाला नाही. मात्र, तो लवकरच भारतीय संघाशी जोडला जाईल, असे सांगण्यात आले. तो दुसर्‍या सामना खेळण्याबाबत साशंकता आहे. पंतला या सामन्याला मुकावे लागल्यास राहुललाच यष्टिरक्षणाची धुरा सांभाळावी लागेल, तर मनीष पांडे आणि केदार जाधवपैकी एका फलंदाजाला संधी मिळू शकेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here